Onion Prices : देशात महागाईचा आकडा घसरला असला तरी भाजीपाल्याचे दर दिवसागणिक वाढत असल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसतो आहे. याआधी जुलै-ऑगस्टमध्ये टोमॅटोच्या वाढत्या किमतीने सर्व विक्रम मोडीत काढले आणि ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचले. आता कांद्याचे सतत वाढत जाणारे भाव जनतेच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. देशातील किरकोळ बाजारात तसेच घाऊक बाजारात कांद्याचे दर नवीन उंची गाठत आहेत. कांद्याचे भाव महाराष्ट्रातील घाऊक बाजारात आठवडाभरात सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहेत, गेल्या आठवड्यात २५०० रुपये प्रति क्विंटलवरून ३२५० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत.
कांद्याचे भाव किती वाढले?
महाराष्ट्रातील पिंपळगाव आणि लासलगाव कृषी बाजार समिती या आशियातील सर्वात मोठ्या कांद्याच्या बाजारपेठा आहेत, ज्यांनी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात भाव वाढण्यास सुरुवात केली होती. कांद्याचे भाव 5 ऑगस्ट रोजी १२०० रुपये प्रति क्विंटलवरून ७ ऑगस्ट रोजी १९०० रुपयांवर पोहोचले होते. ९ ऑगस्ट रोजी ते २५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. किरकोळ वस्तूंच्या किमती ३० रुपये प्रति किलोच्या आसपास होत्या. जुलै ते आज १९ ऑक्टोबर या कालावधीत कांद्याच्या किमतींची तुलना केली तर तो दर सुमारे ५० टक्क्यांनी वाढला आहे. ग्राहक व्यवहार विभागाने दिलेल्या कमोडिटी डेटानुसार, १ जुलै २०२३ रोजी कांद्याची किरकोळ किंमत २४.१७ रुपये प्रति किलो होती, जी आज १९ ऑक्टोबर रोजी ३५.९४ रुपये प्रति किलो झाली आहे. असे पाहिले तर कांद्याचे दर सरासरी जवळपास ५० टक्क्यांनी वाढले आहेत.
कांद्याचे भाव का वाढत आहेत?
खरिपाची पिके येण्यास उशीर झाल्याने लाल कांद्याची उपलब्धता कमी झाल्याने कांद्याचे भाव नवे उच्चांक गाठत आहेत. पुरवठ्याअभावी कांद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामागील मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात उशिरानं आलेला मान्सून आणि असमानता आहे. त्याबरोबरच कर्नाटकातील कांदा पट्ट्यात उत्पादनही कमी झाले असून, त्याचा परिणाम कांद्याच्या पुरवठ्यावर दिसून येत आहे.