पीटीआय, नवी दिल्ली
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत उच्चांकी पातळी गाठली असून, जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपन्यांकडून वितरकांना १० लाख ७४ हजार १८९ प्रवासी वाहने रवाना करण्यात आली, अशी माहिती वाहन उद्योगाची संघटना ‘सियाम’ने सोमवारी दिली. आगामी काळात सणासुदीमुळे वाहन विक्रीत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
कंपन्यांकडून वितरकांना मागील आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत १० लाख २६ हजार ३०९ प्रवासी वाहने रवाना करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत हे प्रमाण १० लाख ७४ हजार १८९ वर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ४.७ टक्के वाढ नोंदविण्यात आली. आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) पहिल्यांदाच देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सचे (सियाम) अध्यक्ष विनोद अगरवाल म्हणाले की, युटिलिटी आणि स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांना मागणी वाढल्याने प्रवासी वाहनांच्या विक्रीतील वाढीतही दिसून येते. एकूण विक्रीत या प्रकारच्या वाहनांचे प्रमाण ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. कमी किमतीच्या मोटारींच्या विक्रीत मात्र घट सुरू आहे. दुसऱ्या तिमाहीत कमी किमतीच्या मोटारींची विक्री ३५ हजार असून, २०१८-१९ मधील दुसऱ्या तिमाहीत ही विक्री १.३८ लाख होती.
दुचाकी विक्रीत घट
प्रवासी वाहने, तीन चाकी वाहने आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये दुसऱ्या तिमाहीत वाढ झाली आहे. असे असले तरी दुचाकींच्या विक्रीत घट नोंदविण्यात आली. ग्रामीण भागात मागणी अद्याप कमी असल्याने दुचाकी विक्री कमी आहे. दुसऱ्या तिमाहीत ४५ लाख ९८ हजार ४४२ दुचाकींची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री ४६ लाख ७३ हजार ९३१ होती.
देशातील वाहन विक्री (जुलै ते सप्टेंबर २०२३)
० प्रवासी वाहने : १०,७४,१८९
० व्यावसायिक वाहने : २,४७,९२९
० तीनचाकी वाहने : १,९५,२१५
० दुचाकी – ४५,९८,९२९
० एकूण वाहन विक्री : ६१,१६,०९१