मुंबई: पतंजली फूड्सने आंशिक समभाग विक्रीची (ओएफएस) घोषणा केली असून त्याअंतर्गत २.५३ कोटी समभागांची (प्रवर्तकांकडील ९ टक्के हिश्शाची) विक्री करण्यात येणार आहे. कंपनीने यासाठी १,००० रुपये प्रति समभाग किंमत निश्चित केली आहे. पतंजली फूड्सने बाजार मंचांना दिलेल्या माहितीनुसार, ही समभाग विक्री १३ आणि १४ जुलै असे दोन दिवस खुली राहणार असून, शुक्रवार, १४ जुलै रोजी किरकोळ गुंतवणूकदारांना समभाग खरेदीसाठी अर्ज करता येईल. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव हिश्शासाठी गुरुवारी झालेल्या समभाग विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिने भरणा पूर्ण केला.
हेही वाचा… केंद्र सरकार होणार मालामाल, ऑनलाइन गेमिंगवर जीएसटीमुळे तिजोरीत तब्बल २०,००० कोटींची भर पडणार
पतंजली आयुर्वेद ही पतंजली फूड्सची सर्वात मोठी भागधारक असून तिचा हिस्सा ३९.३७ टक्के आहे, तर पतंजली फूड्समध्ये प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाची एकत्रितपणे ८०.८ टक्के हिस्सेदारी आहे. पतंजली फूड्सने ओएफएसच्या घोषणेनंतर गुरुवारच्या सत्रात समभागात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात तो ५ टक्क्यांच्या घसरणीसह १,१६६.६५ रुपयांवर बंद झाला.