पीटीआय, नवी दिल्ली
येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत, एप्रिलमध्ये पतंजली फूड्स (पीएफएल) बाजारात फॉलो-ऑन पब्लिक ऑफर आणेल. ज्यामुळे कंपनीतील सार्वजनिक भागीदारी २५ टक्क्यांवर पोहोचेल, अशी माहिती बाबा रामदेव यांनी गुरुवारी दिली.
आघाडीचे बाजार मंच असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजाराने पतंजली समूहाचे प्रवर्तक आणि तिच्या प्रवर्तक कंपन्यांचे समभाग गोठवले आहेत. यामध्ये पतंजली आयुर्वेद आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आणि पतंजली योगपीठ हरिद्वारचे सह-संस्थापक आचार्य बाळकृष्ण यांच्यासह त्यांच्या २१ प्रवर्तक संस्थांच्या समभागांचा समावेश आहे. सार्वजनिक भागीदारीच्या किमान नियमांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरल्याने ही कारवाई करण्यात आली.
भांडवली बाजार नियामक सेबीच्या नियमानुसार, भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनीत प्रवर्तकांची कमाल ७५ टक्के हिस्सेदारी तर किमान २५ टक्के हिस्सेदारी सार्वजनिक भागधारकांकडे असणे बंधनकारक आहे. मात्र डिसेंबर २०२२ च्या कंपनीच्या भागधारणेनुसार, पतंजली फूड्सचे ८०.८२ टक्के समभाग प्रवर्तक आणि प्रवर्तक कंपन्यांकडे आहेत, तर सार्वजनिक भागीदारी केवळ १९.१८ टक्के आहे.
‘सेबी’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, समभाग सूचिबद्ध झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष म्हणजेच ८ एप्रिल २०२३ पर्यंत प्रवर्तकांचे समभाग आधीच ‘लॉक-इन’मध्ये आहेत. लवकरच एफपीओच्या माध्यमातून प्रवर्तक आणि प्रवर्तक कंपन्यांची सुमारे ६ टक्के हिस्सेदारी कमी करण्यात येणार आहे. मात्र बाजाराची स्थिती सध्या अनुकूल नसल्यामुळे एफपीओला विलंब झाला, असे बाबा रामदेव यांनी ‘सेबी’च्या कारवाईपश्चात स्पष्टीकरण दिले.
पतंजली समूहाचा भाग बनलेल्या आणि भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या रुची सोया इंडस्ट्रीजने ४,३०० कोटी रुपये उभारण्यासाठी गेल्या वर्षी मार्चदरम्यान ‘एफपीओ’ आणला होता. त्याला गुंतवणूदारांकडून त्यावेळी ३.६ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. कंपनीने ‘एफपीओ’च्या माध्यमातून ४.८९ कोटी समभाग विक्री केले होते. मात्र त्यावेळी रुची सोयाच्या एफपीओबाबत गुंतवणूकदारांना भाव वधारण्याचे आमिष दाखवणारा अनाहूत लघुसंदेश (एसएमएस) फिरल्यामुळे गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारा अनुचित प्रकार घडल्याचे निरीक्षण नोंदवत ‘सेबी’ने २८ मार्च २०२२ ला बोलीदारांना ‘एफपीओ’मधून माघारीची वाट मोकळी करून दिली होती.