मुंबई : डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ची भागभांडवल विक्रीबाबत अदानी समूहाशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे दोन्ही समूहांनी बुधवारी स्पष्ट केले. परंतु या वदंतेपोटी पेटीएमच्या समभागाने बुधवारच्या सत्रात ५ टक्क्यांनी उसळी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पेटीएम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा हे अदानी समूहासोबत भागविक्रीसाठी चर्चा करत असल्याची वदंता बुधवारी बाजारात होती. मात्र त्यावर टिप्पणी करताना, ‘पेटीएम’मधील संभाव्य हिस्सा खरेदीचे हे वृत्त निराधार असल्याचे ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ने स्पष्ट केले. याचबरोबर अशा कोणत्याही हिस्सा खरेदीसाठी चर्चेत समूह गुंतलेला नाही, असे स्पष्टीकरण अदानी समूहाच्या प्रवक्त्यानेही केले.

हेही वाचा >>> आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचे दुपटीने व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट

‘केवायसी’सह अन्य नियमांचे पालन करण्यात हयगय केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवसायावर निर्बंध जानेवारी महिनाअखेरीस लादले आहेत. त्यानंतर त्यातील वरिष्ठ स्तरावरील अनेकांचे राजीनामा-सत्र सुरू झाले. खुद्द प्रवर्तक समूहातील विजय शेखर शर्मा यांनी बँकेतील पद सोडले आहे. त्या पश्चात डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’वरील संकट गडद होत चालले आहे. याचबरोबर जपानस्थित सॉफ्टबँकेने पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्समधील हिस्सा विक्री सुरू ठेवली असल्याने समभागात घसरण सुरूच आहे. ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर रिझर्व्ह बँकेने कारवाई केल्यापासून ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चे बाजारमूल्य निम्म्याने घटले आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीमध्ये, ‘पेटीएम’ आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसशी बोलणी सुरू असल्याची चर्चा सुरू होती. परंतु दोन्ही समूहांनी त्या अटकळीला नाकारले होते.

हेही वाचा >>> राहणीमानाच्या खर्चाचा पगारावर प्रभाव नाही: सर्वेक्षण; पुणे नोकरीच्या दृष्टीने सुरक्षित शहर

विजय शेखर शर्मा यांची ‘पेटीएम’मध्ये ९.१ टक्के हिस्सेदारी आहे, तसेच रेझिलिएंट ॲसेट मॅनेजमेंट या परदेशी संस्थेमार्फत मार्चअखेरपर्यंत १०.३ टक्के मालकी हिस्सा आहे.

बाजारमूल्य गाळात

मुंबई शेअर बाजारात बुधवारच्या सत्रात पेटीएमचे समभाग मूल्य ५ टक्क्यांनी वधारून ३५९.५५ रुपयांवर स्थिरावले. सध्याच्या या बाजार भावानुसार ‘पेटीएम’चे २२,८५३ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये हा समबाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाला त्या वेळी बाजार भांडवल १.०१ लाख कोटी रुपये होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paytm issues clarification on report claiming adani in talks to acquire stake in company print eco news zws
Show comments