मराठीतून ध्वनी-सूचना देणाऱ्या उपकरणांचा पहिल्यांदाच वापर
मुंबईः पहिल्या वर्षात सर्वाधिक स्मार्ट स्पीकर तैनात करत, या आघाडीवर स्पर्धकांना खूप मागे सोडले असल्याचा फोनपे या डिजिटल देयक व्यासपीठाने दावा केला आहे. चार दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी, समर्पित इंटरनेट जोडणी, मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांतील आवाजात व्यवहार पूर्तीची सूचना अशी तिच्या स्मार्ट स्पीकरची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण तिने सांगितली आहेत.करोनाकाळात २०२० मध्ये आवाजाद्वारे व्यवहारांना प्रमाणित करणारे ध्वनिक्षेपण उपकरण अर्थात ‘साउंडबॉक्स’ प्रस्तुत करणारी तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा क्षेत्रातील अग्रणी पेटीएम ही पहिली कंपनी होती. त्यानंतर भारतपे आणि फोनपेदेखील या शर्यतीत उतरले आणि त्यांनी त्यांची स्मार्ट स्पीकर उपकरणे अनुक्रमे फेब्रुवारी २०२२ आणि जुलै २०२२ मध्ये प्रस्तुत केली.
मात्र अल्पावधीतच ध्वनिक्षेपण उपकरणांच्या कार्यप्रदर्शनाबाबत व्यापाऱ्यांकडून फोनपेला अभूतपूर्व प्रतिसाद प्राप्त होत आहे. त्याचा परिणाम म्हणून, शहरी आणि ग्रामीण बाजारात नवीन व्यापारी भागीदारांमध्ये स्मार्ट स्पीकरच्या मागणीत निरंतर वाढ होत असल्याचे, फोनपेच्या महाराष्ट्रातील प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः गर्दीच्या प्रसंगी व्यापारी आणि खुद्द ग्राहकांना त्यांच्याकडून गेलेली देय रकमेचा पडताळा हा स्पीकरवरून झालेल्या मराठी भाषेतील सूचनेतून करू शकतात. म्हणजेच ग्राहकांना आणि विक्रेत्यांनाही बँकेकडून व्यवहाराच्या पूर्ततेची पुष्टी करणाऱ्या लघुसंदेशाची प्रतीक्षा करावी लागत नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>सेंट्रल बँकेला ४१८ कोटींचा नफा, मागील वर्षीच्या तुलनेत ७७ टक्क्यांची वाढ
हेही वाचा >>>मोदी पर्वातील ऐतिहासिक सुधारणांमुळे भारत प्रगतिपथावर
सध्या देशभरातील १९,००० पिन कोड क्रमांकापर्यंत (देशाचा ९० टक्क्यांहून अधिक भाग) फोनपेच्या व्यापारी भागीदारांद्वारे व्यापला गेला आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये, फोनपेने लक्षावधी व्यापारी भागीदारांचे यशस्वीरीत्या डिजिटलीकरण पूर्ण केले आहे.