पीटीआय, नवी दिल्ली
फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी फोनपे आता भांडवली बाजारातील दलाली पेढी व्यवसायात उतरली आहे. समभाग खरेदी-विक्रीसाठी ‘शेअर डॉट मार्केट’ हा मंच सुरू केल्याची घोषणा कंपनीने बुधवारी केली.
नवीन मंचाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी उज्ज्वल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने भांडवली बाजारातील दलाली पेढीच्या व्यवसायात पदार्पण केले आहे. त्यातून वित्तीय सेवा क्षेत्रातील सर्वच विभागांत कंपनीने आता पाऊल टाकले आहे. आता आमचा ‘शेअर डॉट मार्केट’ हा नवा ब्रँड सुरू होत आहे, अशी माहिती कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी दिली.
हेही वाचा – मनरेगा कामगारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा, आधार पडताळणीची मुदत वाढवली
वॉलमार्ट समूहाच्या मालकीची असलेल्या फोनपे कंपनीने भांडवली बाजार आणि ईटीएफमधील व्यवहारांसाठी ‘शेअर डॉट मार्केट’ ही नवीन दलाली पेढी सुरू केली आहे. नंतर तिच्यावर फ्युचर आणि ऑप्शन या सुविधाही उपलब्ध होणार आहे. मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन राममूर्ती यांच्या हस्ते या नवीन पेढीच्या ब्रँडचे अनावरण करण्यात आले. सध्या फोनपे कंपनीकडून डिजिटल व्यवहार, ई-कॉमर्स आणि विमा आदी सेवा ग्राहकांना दिल्या जातात.
भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना अधिकाधिक मूल्य मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे. आमची तंत्रज्ञानसिद्धता आणि चांगली उत्पादन सेवा यामुळे या क्षेत्रात आम्ही मोठी वाढ नोंदविण्यात यशस्वी होऊ. – समीर निगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, फोनपे