नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी गुरुवारी अर्थतज्ज्ञांची भेट घेणार असून त्यांचे आगामी अर्थसंकल्पाबाबत विचार आणि सूचना जाणून घेणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या २३ जुलैला लोकसभेत आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करतील. ट वर्षात फेब्रुवारीच्या सुरुवातीला, सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०२४-२५ साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थतज्ज्ञ आणि क्षेत्रीय तज्ज्ञांव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीला निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्यदेखील उपस्थित राहणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे.

हेही वाचा >>> Stock Market Update: ‘सेन्सेक्स’चे चार शतकी तेजीसह विक्रमी शिखर

वर्ष २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा आराखडा तयार केला जाण्याची अपेक्षा केली जात आहे. आर्थिक सुधारणांच्या योजनेला गती देण्यासाठी सरकार ऐतिहासिक पावले उचलेल, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीपुढील अभिभाषणातून सूचित केले आहे. अर्थसंकल्प हा सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि भविष्यकालीन दृष्टिकोनाला स्पष्ट करणारा महत्त्वाचा दस्तऐवज असतो, असेही राष्ट्रपती म्हणाल्या होत्या.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! दरवाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण, १० ग्रॅमची किंमत ऐकून होऊ लागली गर्दी

कर सवलतीची मागणी

सीतारामन यांनी आगामी अर्थसंकल्पावर अर्थतज्ज्ञ आणि भारतीय उद्योग क्षेत्रातील प्रमुखांसह विविध भागधारकांशी यापूर्वीच चर्चा केली आहे. बऱ्याच तज्ज्ञांनी ग्राहक उपभोग वाढवण्यासाठी, महागाई रोखण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासंबंधी पावले उचलण्यासाठी सामान्य माणसाला कर सवलत देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.