भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका तंत्रज्ञान भागीदारीला चालना मिळण्याची शक्यता आहे. नवीन सेमीकंडक्टर पुरवठा साखळीच्या निर्मितीसाठी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मास्टरकार्ड, एक्सेंचर, कोका-कोला, अडोब सिस्टीम्स आणि व्हिसा यांसारख्या महत्त्वाच्या २० अमेरिकन कंपन्यांच्या सीईओंची पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात भेटही घेणार आहेत. ही भेट अमेरिका आणि भारत यांच्यातील सर्व व्यापारांचे रेकॉर्ड मोडण्यासाठी पुरेशी असल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन हे गेल्या आठवड्यात भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते, त्यांनीच आता सेमीकंडक्टर क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यामध्ये प्रगतीची आशा व्यक्त केली आहे. येत्या आठवड्यात बरेच चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. सेमीकंडक्टर क्षेत्रातील भागीदारी हे अमेरिका-भारत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (ICET) च्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे.

मार्चमध्ये दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि क्वांटम कॉम्प्युटिंग, प्रगत साहित्य, संरक्षण, सेमीकंडक्टर, नेक्स्ट जनरल टेलिकम्युनिकेशन्स, बायोटेक आणि स्पेसमध्ये खासगी उद्योग आणि वैज्ञानिक संस्थांमधील सहकार्य वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सेमीकंडक्टरमध्ये खासगी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी अमेरिका आणि भारत यांच्यात अनेक सामंजस्य करार करण्यात आलेत. या सामंजस्य करारांनुसार दोन्ही देशांना व्यवसायाच्या संधी सुलभ करण्याबरोबरच इकोसिस्टम विकसित करायची आहे.

हेही वाचाः Byju’s Layoff : बायजूमध्ये पुन्हा नोकर कपात, कंपनीने १००० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

व्यापाराच्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत महत्त्वाची

२१-२४ जूनदरम्यान पंतप्रधानांच्या व्यापारी नेत्यांशी होणाऱ्या चर्चेत भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याच्या संधी शोधणे, गुंतवणुकीसाठी त्यांना आकर्षित करणे आणि व्यापार संबंध वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. भारत-अमेरिका व्यापार संबंधांवरील तज्ज्ञांच्या मते, या बैठकीमुळे अमेरिकन व्यवसायासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून भारताचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. नुकतीच अमेरिकन सेमीकंडक्टर निर्माता कंपनी मायक्रॉनने भारतात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याची बातमी समोर आली आहे, ज्यावर या भेटीदरम्यान शिक्कामोर्तब केले जाऊ शकते.

हेही वाचाः बाजारातून ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब; आता RBI म्हणते…

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi us tour to meet more than 20 us companies india will benefit vrd