लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः जवळपास शतकभराचा वारसा लाभलेली सराफ पेढी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडने (पीएनजी ज्वेलर्स) येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात पाऊलखुणा विस्तारताना, विक्री दालनांची संख्या सध्याच्या ३९ वरून, १२० पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी येत्या आठवड्यात भांडवली बाजारात प्रवेश करीत असून, गुंतवणूकदारांकडून १,१०० कोटी रुपये उभारण्याची योजना गुरुवारी तिने पत्रकार परिषदेत जाहीर केली.

पीएनजी ज्वेलर्स सोने, चांदी, प्लॅटिनम आणि हिरेजडित दागिन्यांसह, विविध किमतीतील आणि रचनेतील मौल्यवान धातू/दागिन्यांच्या उत्पादनांची निर्मिती व विक्री करते. विक्री दालनांच्या संख्येच्या मानाने महाराष्ट्रात दुसरे मोठे संघटित आभूषण विक्रेते असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने, आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ दरम्यान ढोबळ नफ्यात ३९.७८ टक्के चक्रवाढ दराने वाढ साधली आहे. याच काळात कंपनीचा विक्री महसूलही ५४.६३ टक्के चक्रवाढ दराने वाढत, मार्च २०२४ अखेर ६,१०८.९ कोटी रुपयांवर गेला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसह, वाढत असलेला लोकांचा उत्पन्न स्तर पाहता, संघटित सराफ क्षेत्रात आगामी काळात अशीच दमदार वाढ संभवते, असे पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले.

हेही वाचा >>>सेवा क्षेत्राची उच्चांकी सक्रियता, ऑगस्ट महिन्यात पीएमआय निर्देशांक ६०.९ गुणांवर

कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी प्रत्येकी ४५६ ते ४८० रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. यातून उभारल्या जाणाऱ्या १,११० कोटींपैकी, प्रवर्तक त्यांच्याकडील २५० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री करणार आहेत, तर उर्वरित ८५० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची नव्याने विक्री प्रस्तावित करण्यात आली आहे. यापैकी ३९३ कोटी रुपयांचा वापर महाराष्ट्रात १२ नवीन दालने सुरू करण्यासाठी कंपनी करणार असून, ३०० कोटींचा वापर कर्जाच्या परतफेडीसाठी केला जाणार आहे, असे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

येत्या १० ते १२ सप्टेंबर दरम्यान गुंतवणूकदारांना या समभागांसाठी बोली लावता येईल. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ३० समभागांसाठी आणि ३० च्या पटीत अर्ज सादर करावा लागेल. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट आणि बॉब कॅपिटल मार्केट्स या कंपन्या ‘आयपीओ’चे व्यवस्थापन पाहात आहेत.