पीटीआय, नवी दिल्ली
सत्तेत येणाऱ्या नवीन सरकारच्या आर्थिक धोरणांवर भांडवली बाजाराची पुढील दिशा अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर, महागाई आणि जागतिक परिस्थिती हे घटकही महत्त्वाची भूमिका बजावतील, असा अंदाज विश्लेषकांनी मंगळवारी वर्तविला.
केंद्रात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत. भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसून, आघाडीतील घटक पक्षांवर यासाठी अवलंबून राहावे लागणार आहे. याचा एकंदरीत परिणाम सरकारच्या ठोस निर्णय प्रक्रियेवर होणार आहे. यामुळे गुंतवणूकदार साशंक झाले आहेत. त्याचाच परिणाम होऊन आज भांडवली बाजारात मंगळवारी मोठी पडझड दिसून आली. सोमवारी मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजाच्या परिणामी हर्षोन्मादाने सेन्सेक्स-निफ्टीने उच्चांकी पातळी गाठली होती, त्याच्या नेमके उलट चित्र मतमोजणीच्या दिवशी दिसून आले.
आणखी वाचा-माध्यम स्वातंत्र्याच्या धोक्यांविरोधात एकजूट करण्याचे ‘झी’ समूहाचे सुभाष चंद्रा यांचे आवाहन
बाजारातील पडझडीच्या पार्श्वभूमीवर हेडोनोव्हाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सुमन बॅनर्जी म्हणाले की, बाजाराची पुढील दिशा नवीन सरकारच्या आर्थिक धोरणांवर अवलंबून असेल. त्यात जीडीपीतील वाढ, महागाई आणि जागतिक अनुकूलतेची स्थिती हे घटक परिणामकारक ठरतील.
भांडवली बाजार सध्या जोखमीचे पैलू पडताळून पाहात आहे. नवीन सरकारचा कल समाजवादी धोरणाकडे झुकल्यास त्याचा परिणाम बाजारावर होईल. त्यातून बाजारात विक्रीचा मारा वाढू शकेल. -यशोवर्धन खेमका, विश्लेषक, अबान्स होल्डिंग्ज