मुंबई : नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यास केंद्राने बुधवारी मान्यता दिली. जानेवारीमध्ये तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर झालेली ही नियुक्ती आहे.

केंद्रीय नियुक्ती समितीने गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली. सध्या, देशातील अर्थविचार व संशोधनांतील सर्वात मोठी संस्था असलेल्या ‘एनसीएईआर’च्या महासंचालक असलेल्या गुप्ता या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या आणि १६ व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या संयोजक म्हणून देखील कार्यरत आहेत.

या आधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेत सुमारे दोन दशके अर्थतज्ज्ञ यांसह विविध पदांवर काम केल्यानंतर २०२१ मध्ये त्या एनसीएईआरमध्ये रुजू झाल्या. गुप्ता यांनी अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठाच्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापन केले आणि दिल्लीतील आयएसआय येथे अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी येथे प्राध्यापक आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स येथे देखील प्राध्यापक देखील राहिल्या आहेत. गुप्ता यांनी अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी प्राप्त केली आहे. दिल्ली विद्यापीठातील दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.