नवी दिल्ली : सरकारने सोमवारी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचतपत्रासह (एनएससी) विविध अल्पबचत योजनांवरील व्याजदर हे १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या सलग तिसऱ्या तिमाहीसाठी कोणताही बदल न करता आहे त्या पातळीवर कायम ठेवले आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत, १ ऑक्टोबर २०२४ पासून ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाचे दर २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (१ जुलै २०२४ पासून सुरू होणाऱ्या) अधिसूचित केलेल्या दरांप्रमाणेच राहतील, असे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> १ ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस, आधार, पॅनसह बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम; प्रत्येकाच्या आर्थिक व्यवहारांवर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

अधिसूचनेनुसार, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवर ८.२ टक्के व्याज मिळेल, तर पोस्टाच्या तीन वर्षांच्या मुदत ठेवीवरील दर ७.१ टक्के राहील. लोकप्रिय असलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि पोस्टाच्या बचत ठेव योजनांचे व्याजदर देखील अनुक्रमे ७.१ टक्के आणि ४ टक्के या पातळीवर राखून ठेवले गेले आहेत. किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.५ टक्के असेल आणि ही गुंतवणूक ११५ महिन्यांत परिपक्व होईल. राष्ट्रीय बचत पत्रावरील (एनएससी) व्याजदर या तिमाही कालावधीसाठी ७.७ टक्के राहील. मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणूकदार ७.४ टक्के दराने व्याज कमावतील. केंद्रीय अर्थमंत्रालय पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांवरील व्याजदरांचा प्रत्येक तिमाहीला आढावा घेऊन, त्यांचे दर निर्धारीत करत असते. तथापि मागील तीन तिमाहींपासून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ppf investors will get a benefit of 7 1 percent print eco news zws