प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) ही गरोदर आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्याच्या प्राथमिक उद्देशाने सुरु केलेली केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना अनेक मातांसाठी आता वरदान ठरतेय. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक प्रोत्साहन देऊन कुपोषणाचे परिणाम कमी करत वैद्यकीय उपचार आणि औषधांचा आर्थिक खर्च कमी करणे हा आहे. आतापर्यंत लाखो-करोडो महिलांनी या योजनेसाठी आपलं नावं नोंदवत योजनेचा फायदा घेतला आहे. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांच्या खात्यात ५००० रुपये जमा करत आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे तुम्हाला सांगणार आहोत.
जाणून घ्या PMMVY योजनेबद्दल
PMMVY योजनेअंतर्गत पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलेच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवले जातात. यामार्फत लाभार्थ मातेच्या बँक खात्यात (DBT) तीन हप्ते जमा केले जातात. यातील पहिला १००० रुपयांचा हप्ता गरोदरपणाच्या नोंदणीच्या वेळी ट्रान्सफर केला जातो, तर २००० रुपयांचा दुसरा हप्ता गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात किमान एक प्रसूतीपूर्व तपासणीनंतर दिला जातो. यानंतर २००० रुपयांचा तिसरा आणि शेवटचा हप्ता मुलाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर दिला जातो.
PMMVY साठी कोण पात्र आहे?
PMMVY योजनेचा लाभ दैनंदिन मजुरी करणाऱ्या महिला किंवा आर्थिकदृष्ट्या अनिश्चित परिस्थितीत असलेल्या महिलांना मिळतो. या योजनेचा मुख्य उद्देश गर्भधारणेदरम्यान अशा महिलांचे होणारे आर्थिक नुकसान कमी करणे आणि महिलांना या महत्त्वपूर्ण काळात आवश्यक वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळण्याची हमी देणे हा आहे. ही आर्थिक मदत मिळाल्याने गर्भवती महिलांना आराम करण्यास मिळतो. या योजनेचा लाभ अशा महिलांना मिळत नाही ज्या केंद्र किंवा राज्य सरकारसोबत कोणत्याही उपक्रमात काम करत आहेत. गर्भवती महिलेचे जन्माला आलेले पहिले मूल या योजनेअंतर्गत पात्र ठरते.
या योजनेत नोंदणी कशी करावी?
PMMVY उपक्रमाचा भारतातील मातृ आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. या कार्यक्रमामुळे गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना वैद्यकीय उपचार आणि काळजी मिळणे सुलभ झाले आहे, मातृत्व वंदना योजना 2021 अंतर्गत केंद्र सरकारने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. म्हणजेच लाभार्थी स्वत: ऑनलाईन नावनोंदणी करु शकतात. यासाठी लाभार्थ्याला http://www.Pmmvy-cas.nic.in या साईटवर जाऊन आधी लॉगिन करावं लागेल आणि आपलं नाव नोंदवावं लागेल. ही नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे घरबसल्याही तुम्ही मोबाईलवर अगदी सहजपणे रजिस्ट्रेशन करु शकता.