मुंबई: जागतिक व्यापारात ट्रम्प यांच्या कर-आक्रमकतेने भांडवली बाजाराचा पुन्हा घात केला. सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी शुक्रवारी सलग आठव्या सत्रात घसरण नोंदवली. गंभीर बाब म्हणजे सलग तिसऱ्या सत्रात निर्देशांकांना दिवसांतील व्यवहारात कमावलेली वाढ टिकवून ठेवण्यात अपयश आले.
सेन्सेक्स दिवसअखेरीस १९९.७६ अंशांनी (०.२६ टक्के) घसरून ७५,९३९.२१ वर बंद झाला, तर निफ्टी १०२.१५ अंशांनी (०.४४ टक्के) घसरून २२,९२९.२५ वर स्थिरावला. अथकपणे सुरू असलेली परकीय गुंतवणूकदारांची विक्री आणि तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांंच्या मिश्र कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना बचावात्मक स्थितीत लोटले गेले आहेत, असे रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधनप्रमुख अजित मिश्रा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, व्यापार कराबाबत जशास तसे उत्तर अमेरिकेकडून भारतासह सर्वच राष्ट्रांना दिले जाईल, या भूमिकेचा पुनरुच्चार केला. अमेरिकी उत्पादनांवर भारतासह इतर देशांकडून लादल्या जाणाऱ्या आयात शुल्काइतकाच कर अमेरिकेकडून त्यांच्याकडून होणाऱ्या निर्यातीवर लादला जाईल आणि निष्पक्ष व्यापार सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यकच ठरेल, यावर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्या समक्षच भर दिला.
वॉशिंग्टनमधील ट्रम्प-मोदी बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी, दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि करांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यास सहमती दर्शविली असल्याचे स्पष्ट केले. नंतर प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनांत, द्विपक्षीय व्यापार संबंधानांचा चालना देण्यासह, त्यायोगे निष्पक्षता, राष्ट्रीय सुरक्षा आणि रोजगार निर्मितीवर भर देण्यावर दोन्ही नेत्यांनी वचनबद्धता दर्शविल्याचे म्हटले आहे. द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत दुप्पट करून ५०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य आश्वासक असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे संशोधनप्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले.
गुंतवणूकदारांना २५.३१ लाख कोटींची झळ
सेन्सेक्स आता ८५,९७८ अंशांच्या सार्वकालीक उच्चांकावरून, सुमारे १०,००० अंशांनी गडगडला आहे. या नवीन वर्षात सेन्सेक्स आतापर्यंत ३ टक्क्यांहून अधिक घसरला असून, मागील आठ सत्रात मिळून सेन्सेक्सने २,४४४.८४ अंश, तर निफ्टीने ८१० अंश गमावले आहेत. रिझर्व्ह बँकेने अलिकडेच केलेली रेपो दर कपात, तर त्या आधी अर्थसंकल्पातील कर-सवलतीच्या तरतुदीही बाजारात आनंद निर्माण करू शकलेल्या नाहीत. २०२४ मध्ये, सेन्सेक्स-निफ्टीने प्रत्येकी ९-१० टक्के वाढ नोंदवली आहे, तर २०२३ मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने एकत्रितपणे १६-१७ टक्के वाढ नोंदवली आहे. तथापि २०२४ च्या सप्टेंबरअखेरपासून बाजाराच्या तीव्र नकारात्मक वळणाने विशेषत: अनेक नवगुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. मागील आठ सत्रात मिळून गुंतवणूकदारांची २५.३१ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक मूल्य मातीमोल झाले आहे.
आकडे
सेन्सेक्स – ७५,९३९.२१ घसरण १९९.७६ (०.२६ टक्के)
निफ्टी – २२,९२९.२५ घसरण १०२.१५ (०.४४ टक्के)
ब्रेंट क्रूड – ७५.४३ वाढ ०.५५ टक्के
डॉलर – ८६.८१ घसरण १२ पैसे