देशातील तरुणांनी दररोज सुमारे १२ तास काम केले पाहिजे, जेणेकरून भारत वेगाने प्रगती करू शकेल. तरुण जेव्हा आठवड्यातून ७० तास काम करतील तेव्हाच भारत पुढे जाऊ शकेल, असेही आयटी कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी तरुणांना सल्ला दिला होते. ‘द रेकॉर्ड’ या पॉडकास्टसाठी इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्याशी बोलताना त्यांनी या गोष्टी सांगितल्या. आता जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनीही नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज १४-१६ तास काम करतात

ते पुढे म्हणाले की, ५ दिवस काम करण्याची संस्कृती आपल्यासारख्या विकसनशील देशाला आवश्यक नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज १४-१६ तास काम करतात. माझे वडील दिवसाचे १२-१४ तास, आठवड्याचे सातही दिवस काम करायचे. मी दररोज १०-१२ तास काम करतो. जर आपल्याला हा देश घडवायचा असेल तर आपण आधी काम करण्याची आवड शोधायची हवी. आमची परिस्थिती अद्वितीय आहे आणि आम्ही ज्या आव्हानांना तोंड देत आहोत ती विकसित देशांपेक्षा वेगळी आहेत. ते आठवड्यातून ४-५ दिवस काम करतात, कारण त्ंयाच्या आधीच्या पिढीने बरेच तास काम केले आहे. आम्ही कमी कामाचे आठवडे रूढ होऊ देऊ शकत नाही. भारताची सर्वात मोठी ताकद तरुणाई आहे. महासत्ता होण्याच्या आपल्या प्रवासात या पिढीने आरामऐवजी कामाला प्राधान्य दिले पाहिजे. जसजसे आपण प्रगती करत आहोत, तसतसे विश्रांतीच्या संधी येतील आणि २०४७ चे तरुण हे आजच्या त्याग आणि वचनबद्धतेचा फायदा घेऊ शकतील.

हेही वाचाः Muhurat Trading 2023 : दिवाळीतही तुम्हाला ट्रेडिंग करता येणार, पैसे कमावण्याचा ‘शुभ मुहूर्त’काय? शेअर बाजाराची घोषणा

सज्जन जिंदाल म्हणाले की, येथे आपण समर्पणाबद्दल म्हणजेच कामावरील प्रेमाबद्दल बोलत आहोत. आपल्याला भारताला एक आर्थिक महासत्ता बनवायचे आहे, ज्याचा आपल्याला २०४७ मध्ये अभिमान वाटेल. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारताचा जीडीपी पुढील २५ वर्षांत ३.५ ट्रिलियन डॉलरवरून ३५ ट्रिलियन डॉलरवर जाईल. भारत २०४७ पर्यंत विकसित देश होईल.

हेही वाचाः मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, ईमेलवरून २० कोटींची मागणी; गुन्हा दाखल

काय म्हणाले नारायण मूर्ती?

नारायण मूर्ती यांनी भारताच्या कमी कार्याच्या उत्पादकतेची कारणेही सांगितली. ते म्हणाले की, सरकारमधील भ्रष्टाचार आणि नोकरशाहीतील दिरंगाई ही कार्याची उत्पादकता कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. “भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. जोपर्यंत आपण सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार कमी करत नाही आणि नोकरशाहीतील दिरंगाईला आळा घालत नाही, तोपर्यंत ज्या देशांनी प्रचंड प्रगती केलीय, त्यांच्याशी स्पर्धा करणे आपल्यासाठी अवघड आहे.” नारायण मूर्ती म्हणाले की, देशाची कार्य उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल. मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन हा देश माझा आहे म्हणा. मला आठवड्यातून ७० तास काम करायला आवडेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने हे केले होते, असे नारायण मूर्ती यांनी सांगितले. बर्‍याच वर्षांपासून दोन्ही देशांनी आणि त्यांच्या नागरिकांनी काही अतिरिक्त तास काम केले, असंही त्यांनी अधोरेखित केले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi works 14 16 hours every day says support of narayan murthy statement from industrialist sajjan jindal vrd
Show comments