पीटीआय, नवी दिल्ली
भाज्यांसह टोमॅटो, डाळी यासारख्या खाद्य-जिनसांच्या अस्मान गाठणाऱ्या किमती सर्वसामान्यांना रडवत असताना, त्याची सुस्पष्ट कबुली देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासाची हमी म्हणून महागाईला नियंत्रित करणे ही सरकारसाठीही प्राधान्याची बाब आहे, असे शुक्रवारी येथे प्रतिपादन केले.
जी-२० राष्ट्रांच्या व्यावसायिक स्वारस्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’द्वारे आयोजित ‘बी-२० इंडिया शिखर परिषदे’ला संबोधित करताना अर्थमंत्री म्हणाल्या, या महिन्यात जाहीर होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचे आकडे चांगले यायला हवेत. बऱ्याच काळासाठी वाढलेले व्याजदर अर्थव्यवस्थेच्या उभारीतील अडथळा ठरत असल्याचे नमूद करून सीतारामन म्हणाल्या, ‘माझे प्राधान्य महागाईवर नियंत्रण ठेवण्याला आहे.’ टोमॅटो आणि भाज्यांच्या वाढत्या किमतींमुळे जुलैमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर १५ महिन्यांच्या उच्चांकी ७.४४ टक्क्यांवर पोहोचल्याची केंद्राने गंभीरतेने दखल घेतल्याचे त्यांनी सूचित केले.
आणखी वाचा-‘जिओफिन’ १ सप्टेंबरपासून ‘सेन्सेक्स’मधून बाहेर
आर्थिक सुधारणांचा वेग भारताला लक्षणीयरीत्या वाढवता आला आहे आणि पहिल्या तिमाहीत जीडीपीचे आकडे हे अपेक्षेप्रमाणे चांगलेच राहण्याची आशा असल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ३१ ऑगस्टला पहिल्या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर करणार आहे.
सीतारामन म्हणाल्या की, अर्थसंकल्पात भांडवली खर्चात सरकारने केलेल्या वाढीमुळे खासगी भांडवली गुंतवणुकीला ‘हिरवा कोंब’ फुटून चालना मिळाल्याचे जाणवू लागले आहे. सुधारणांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी ‘क्लायमेट फायनान्सिंग’ला सुरुवात करण्यात आली आहे, जी परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासह, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
आणखी वाचा-रिलायन्स रिटेलमधील आणखी १० टक्के हिस्साविक्री शक्य
शेतीसाठी आफ्रिकेकडे चला -मित्तल
जगातील ६० टक्के जिरायती, शेतीयोग्य सुपीक जमीन आफ्रिकेत आहे आणि शेतीसाठी आफ्रिकेची कास धरल्यास अन्नसंकटावर उपायासह जगाचा चेहरामोहराही बदलू शकेल, असा विश्वास भारती समूहाचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी बी-२० शिखर परिषदेत बोलताना व्यक्त केला. आफ्रिकी आर्थिक एकात्मताविषयक बी-२० इंडिया कृती परिषदेचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असणाऱ्या पण तितक्याच मागास असलेल्या आफ्रिकन खंडातील काही भागांतील जमीन इतकी सुपीक आहे की, ‘तुम्ही फक्त बी टाका आणि पीक वाढताना दिसेल… आणि तरीही ते दुर्लक्षिले जात आहे’, असे ते म्हणाले. आफ्रिकी देशांच्या संघाला लवकरच जी-२० राष्ट्रगटाचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.