नवी दिल्ली : देशातील खासगी क्षेत्राची सक्रियता फेब्रुवारीमध्ये सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. सेवा क्षेत्राच्या सक्रियतेत मोठी वाढ झाली असून, रोजगार निर्मितीतही भर पडल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.

देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात ६०.६ गुणांवर नोंदला गेला. जानेवारीमध्ये हा गुणांक ५७.७ होता. सेवा क्षेत्राच्या सक्रियतेत मोठी वाढ होऊन त्याचा पीएमआय निर्देशांक फेब्रुवारीत ६१.१ गुणांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी मार्चनंतरची ही त्याची उच्चांकी पातळी आहे. मात्र, निर्मिती क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक कमी होऊन ५७.१ गुणांवर आला आहे. असे असले तरी ५० गुणांवर राहिल्याने त्याचा विस्तारपूरक क्रम कायम आहे.

नवीन व्यवसायात वाढ झाल्याने सेवा क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे. यामुळे संयुक्त पीएमआय सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. उत्पादन क्षेत्राच्या नवीन कार्यादेशात वाढ झाली असली तरी ती गेल्या महिन्यापेक्षा कमी आहे. याचवेळी रोजगार निर्मितीत वाढ दिसून आली असून, ती २००५ नंतरची सर्वांत वेगवान वाढ आहे. आगामी काळात सकारात्मक चित्र राहील, असा विश्वास व्यवसायांना आहे. विशेषत: उत्पादन वाढीबाबत आशावाद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक चित्र

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांबरोबरच्या व्यापारावर अतिरिक्त आयात शुल्क आकारणी सुरू केली आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. याचा भारताला फटका बसण्याची शक्यता आहे. भारताचा विकास दर चार वर्षांतील नीचांकी पातळीवर मागील तिमाही नोंदवला गेला. असे असले तरी खासगी क्षेत्राच्या ताज्या गतिमानतेमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.