लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः बाजार नियामक ‘सेबी’ने स्टॉक एक्सचेंजेस आणि इतर बाजारसंलग्न पायाभूत संस्थांना (एमआयआय) उलाढालीच्या प्रमाणावर आधारित वेगवेगळी शुल्क रचना न ठेवता सर्व सदस्यांसाठी एकसमान आणि समान शुल्क रचना लागू करण्याचे निर्देश दिल्यानंतर मंगळवारच्या सत्रात सर्वच दलाली पेढ्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली.
मुंबई शेअर बाजारातील मंगळवारचे व्यवहार आटोपले तेव्हा, एंजल वनचा समभाग ८.७२ टक्के, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ६.८३ टक्के, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ४.१९ टक्के, एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज २.८१ टक्क्यांनी, डोलत अल्गोटेकचा समभाग २.२८ टक्क्यांनी आणि ५ पैसा कॅपिटलचा समभाग ०.०५ टक्क्यांनी घसरला. दिवसाच्या व्यवहारात एंजल वनचा समभाग साडेदहा टक्क्यांनी आपटला होता. नियामकांनी शेअर बाजार, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि एमआयआय म्हणून स्थापन केल्या गेलेल्या डिपॉझिटरीजना अंतिम ग्राहकांकडून वसूल केलेले कोणतेही शुल्क ‘ट्रू टू लेबल’ अर्थात जे वाजवी आणि पूर्वनिर्धारीत आहे त्या प्रमाणेच ते राहिल हे पाहण्याचे निर्देश दिले आहेत.
‘सीडीएसएल’चा एकास एक बोनस
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (सीडीएसएल) संचालक मंडळाने कंपनीच्या भागधारकांना १:१ या प्रमाणात बक्षीस समभाग (बोनस) देण्याची शिफारस मंगळवारी केली. म्हणजे सीडीएसएलच्या भागधारकांना त्यांच्याकडील प्रत्येक समभागावर एक समभाग बक्षीस रूपात नि:शुल्क दिला जाईल. कंपनीने जाहीर केलेला हा पहिलाच बोनस आहे.
संचालक मंडळाच्या या बैठकीच्या निर्णयाच्या दोन महिन्यांच्या आत म्हणजे १ सप्टेंबर २०२४ पूर्वी ही प्रक्रिया नियमानुरूप पूर्ण केली जाणे अपेक्षित आहे. तथापि कंपनीने या संबंधाने भागधारकांची पात्रता ठरवणारी ‘रेकॉर्ड तारीख’ जाहीर केलेली नाही. बक्षीस समभागांच्या घोषणेनंतरही, सीडीएसएलचे समभाग मंगळवारी एनएसईवर २.१० टक्के घसरणीने २,३८६.८५ रुपयांवर बंद झाले. कंपनीचे समभाग मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईवर सूचीबद्ध नाहीत.
© The Indian Express (P) Ltd