लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या इन्फोसिस आणि विप्रो यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या सरलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या कामगिरीनुसार, मिळकतीत एकंदर अपेक्षेपेक्षा सरस वाढ करत अनुक्रमे ६,५०६ कोटी रुपये आणि ३,२०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत इन्फोसिसने कमावलेला ६,५०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा, मागील वर्षाच्या तुलनेत ४.७ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने ६,२१२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. तर तिमाहीगणिक नफ्यात २.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण महसूल ४.२ टक्क्यांनी वाढून ४०,९८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा >>>‘सॅटकॉम’साठी स्पेक्ट्रम वाटपाच्या सरकारच्या भूमिकेने अंबानींविरोधात मस्क यांना झुकते माप

दुसऱ्या तिमाहीतील या स्थिर कामगिरीमागे, जागतिक पातळीवर बहुराष्ट्रीय कंपन्यांशी झालेले मोठे सौदे, कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील नवीन करार आणि यासह या क्षेत्रातील सेवांना असलेली वाढती मागणी हे प्रमुख घटक आहेत. शिवाय कंपनीकडे आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्य आणि क्लाउड बाजारपेठेत आघाडी कायम आहे, असे इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख म्हणाले.

इन्फोसिसने प्रति समभाग २१ रुपयांचा अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे. यासाठी २९ ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख केली असून भागधारकांना ८ नोव्हेंबरला लाभांश प्राप्त होईल. यापूर्वी, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी, कंपनीने अंतिम लाभांश रुपये २०, विशेष लाभांश रुपये ८ आणि १८ रुपये अंतरिम लाभांश दिला होता. एकंदर भागधारकांच्या पदरी प्रति समभाग ४६ रुपये लाभांश मिळाला होता.

विप्रोकडून एकास एक बक्षीस समभाग

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या विप्रोने एकास एक (१:१) बक्षीस समभाग देण्याची घोषणा केली आहे. कंपनीकडून लवकरच रेकॉर्ड तारखेची घोषणा करण्यात येईल. आताची बक्षीस समभागांची योजना गृहीत धरल्यास, भागधारकांना बक्षीस समभाग देण्याची विप्रोची १४ वी वेळ आहे. आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये सर्वाधिक वेळा बक्षीस समभाग देणारी ही कंपनी आहे.

हेही वाचा >>>अदानी ग्रीनकडून १.२ अब्ज डॉलरची रोखे विक्री लांबणीवर

सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरीदेखील चमकदार राहिली असून, कंपनीच्या निव्वळ नफ्यात २१.२ टक्क्यांनी वाढ झाली असून तो ३,२०८.८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीला २,६४६.३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. महसुलाच्या आघाडीवर किंचित निराशा असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.९५ टक्क्यांनी कमी होऊन २२,३०१.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्यावर्षी सप्टेंबर तिमाहीत २२,५१५.९ कोटी रुपये नोंदवला गेला होता.

विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनी पलिया म्हणाले की, दुसऱ्या तिमाहीत अपेक्षित कामगिरी कायम राखता आली आहे. मोठ्या सौद्यांमुळे कंपनीकडील कार्यादेशाने १ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. सलग दुसऱ्या तिमाहीत हा वेग कायम असून एआय तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी म्हणून उदयास येण्यासाठी गुंतवणूक करत राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.