नवी दिल्ली, वृत्तसंस्था
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ म्युच्युअल फंडांना परदेशात गुंतवणूक करणाऱ्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडामध्ये (ईटीएफ) येत्या १ एप्रिलपासून नवीन गुंतवणूक स्वीकारण्यास मनाई केली आहे.
म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाला (ॲम्फी)’ परदेशातील गुंतवणूक असणाऱ्या ईटीएफ योजनांमध्ये नवीन गुंतवणूक प्रवाह रोखण्यास ‘सेबी’ने सांगितले असून, परदेशातील समभागांमधील देशातील गुंतवणुकीने ७ अब्ज डॉलरची मर्यादा ओलांडल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. म्युच्युअल फंड योजनांमधून थेट परदेशात थेट समभाग खरेदी केली जाते त्यासह एकत्रिक मर्यादा ७ अब्ज डॉलरची असून, जानेवारी २०२२ मध्ये गुंतवणुकीची ही कमाल मर्यादा गाठली गेली आहे.
हेही वाचा >>>‘कॅम्पस प्लेसमेंट’मधूनही नोकर भरतीला ग्रहण; केवळ ७ टक्के महाविद्यालयांतूनच १०० टक्के भरती झाल्याचे अहवालातून उघड
भारतात सध्या ७७ म्युच्युअल फंड योजना आहेत ज्या परदेशात गुंतवणूक करतात. सेबीने २०२३ मध्ये परदेशातील बाजारातील घसरणीमुळे त्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता घसरल्याने या फंड घराण्यांना पुन्हा परदेशी समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली होती.
काही फंड घराण्यांना परदेशात गुंतवणूक असणाऱ्या योजनांमध्ये नवीन गुंतवणुका घेणे बंददेखील केले आहे. तथापि सुरू असलेल्या ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी’ सुरू राहतील तसेच ‘सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन – एसटीपी’ सुविधेचा लाभ घेणाऱ्या गुंतवणूकदारांवर या निर्बंधांचा कोणताही परिणाम संभवत नसल्याचे या फंड घराण्यांनी स्पष्ट केले आहे.