नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चांगली कामगिरी केली आहे. या बँकांनी निव्वळ नफ्यात सुमारे २६ टक्के वाढ नोंदविली आहे. याचबरोबर बँकांच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झालेली असून, बुडीत कर्जांमध्ये घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिली.
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकाचा एकूण व्यवसाय २३६.०४ लाख कोटी रुपये झाला. गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत त्यात ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. पहिल्या सहामाहीत बँकांच्या कर्ज वितरणात आणि ठेवींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे १२.९ टक्के आणि ९.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. बँकांचे कर्ज वितरण १०२.२९ लाख कोटी रुपये असून, ठेवी १३३.७५ लाख कोटी रुपयांच्या आहेत, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
पहिल्या सहामाहीत बँकांचा कार्यचालन नफा १ लाख ५० हजार २३ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ८५ हजार ५२० कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्यचालन नफ्यात १४.४ टक्के आणि निव्वळ नफ्यात २५.६ टक्के वाढ झाली आहे. बँकांचे एकूण बुडीत कर्ज (ग्रॉस एनपीए) आणि निव्वळ बुडीत कर्ज (नेट एनपीए) अनुक्रमे ३.१२ टक्के आणि ०.६३ टक्के आहे, असे अर्थ मंत्रालयाने नमूद केले.
बँकिंग सुधारणांचा परिणाम बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि नियमित देखरेख यामुळे सार्वजनिक बँकांची कामगिरी सुधारली आहे. बँकांच्या कामकाजाबाबतच्या अनेक चिंता आणि त्यातील आव्हाने आता दूर झाली आहेत. त्यातून बँकिंग व्यवस्थेत सुधारणा झाली आहे. कर्ज वितरणात शिस्त आली असून, प्रशासनातही सुधारणा झाली आहे. वित्तीय समावेशन मोहिमा आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार या पातळीवरही सार्वजनिक बँका चांगली कामगिरी करीत आहेत, असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे.