लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
पुणे: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ८८२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला. मागील वर्षीच्या तुलनेत नफ्यात ९५ टक्के वाढ झाली आहे.
‘महाबँके’ने बुधवारी तिमाही निकाल जाहीर केले. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न २ हजार ३३९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षी ते १ हजार ६८५ कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षात निव्वळ व्याज नफा ३.८६ टक्के आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तो ३.२८ टक्के होता.
हेही वाचा… केंद्राकडून टोमॅटोच्या दरात आणखी कपात; NCCF आणि NAFED द्वारे ७० रुपये प्रति किलो दराने विक्री
बँकेच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण २.२८ टक्क्यांवर आले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते ३.७४ टक्के होते. बँकेची एकूण थकीत कर्जे जूनअखेरीस ४ हजार ६ कोटी रुपयांवर आली आहेत. ती मागील वर्षी याच तिमाहीत ५ हजार २९५ कोटी रुपये होती. बँकेच्या निव्वळ थकीत कर्जाचे प्रमाण ०.२४ टक्क्यांवर आले असून, मागील वर्षी ०.८८ टक्के होते. पहिल्या तिमाहीत निव्वळ थकीत कर्जे ४१३ कोटी रुपयांवर आली असून, मागील वर्षी ती १ हजार २०६ कोटी रुपये होती.
ठेवींमध्ये २५ टक्के वाढ
महाबँकेच्या ठेवींमध्ये पहिल्या तिमाहीत २५ टक्के वाढ होऊन त्या २.४४ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. मागील वर्षी याच तिमाहीत त्या १.९६ लाख कोटी रुपये होत्या.