पीटीआय, नवी दिल्ली

देशातील आघाडीची सिमेंट निर्माता कंपनी अल्ट्राटेकने चेन्नईस्थित प्रतिस्पर्धी कंपनी इंडिया सिमेंट लिमिटेडमध्ये २३ टक्के भागभांडवल खरेदी करणार आहे. सुमारे १,८८५ कोटी रुपयांना हा व्यवहार पार पडणार आहे.

आदित्य बिर्ला समूहाची कंपनी असलेली, अल्ट्राटेक सिमेंट आता इंडिया सिमेंटचे ७.०६ कोटी समभाग प्रत्येकी २६७ रुपयांना खरेदी करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने इंडिया सिमेंटमध्ये २३ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यास गुरुवारी मान्यता दिली.

अल्ट्राटेकची प्रतिवर्ष १५.२७ कोटी टन सिमेंट उत्पादनाची क्षमता असून कंपनीने त्यात आणखी विस्ताराची योजना आखली आहे. या विस्तार योजनेअंतर्गत कंपनीने २० एप्रिलला इंडिया सिमेंटकडून महाराष्ट्रातील ग्राइंडिंग प्रकल्पांची ३१५ कोटी रुपयांना खरेदी केली. गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत अल्ट्राटेकने आपली क्षमता १८.७ दशलक्ष टनांनी वाढवली आहे. कंपनीने पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने ३२,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक योजना आखली आहे.

हेही वाचा >>>मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाकडून देशातील पहिला ‘ईव्ही’केंद्रित एक्सचेंज ट्रेडेड फंड दाखल

सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनण्याचे लक्ष्य

वर्ष २०२३ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी वार्षिक २० कोटी टन सिमेंट उत्पादन क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांचे उद्दिष्ट जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनण्याचे आहे. सध्या सिमेंट उद्योगात आदित्य बिर्ला समूहाच्या कंपनीनंतर अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्या मालकीच्या अंबुजा सिमेंटचा क्रमांक लागतो, तिची ७.९ कोटी टन सिमेंट उत्पादन क्षमता आहे.

समभाग ५२ आठवड्यांच्या उच्चांकी

अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागाने गुरुवारच्या सत्रात ११,८७४.९५ ही ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर समभाग ५७३.६० रुपयांनी म्हणजेच ५.१५ टक्क्यांनी वधारून ११,७१६.७० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ३,३८,२५७ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे. इंडिया सिमेंटचा समभागही बीएसईवर १३,७० टक्क्यांनी वाढून २९९ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. दिवसअखेर तो ११.४९ टक्क्यांनी वाढून २९३.१५ रुपयांवर बंद झाला.