लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: औद्योगिक पॅकेजिंग क्षेत्रात कार्यरत पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेडने खेळत्या भांडवलाची गरज म्हणून प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली असून, पुढील आठवड्यात शुक्रवारी १८ ऑगस्टला ही भागविक्री खुली होईल, तर २२ ऑगस्टला ती बंद होईल. या प्रक्रियेतून १५३ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.
पॉलिमर-आधारित मोल्डेड उत्पादने जसे मजबूत धाटणीचे इंटरमीडिएट बल्क कंटेनर्स, पॉलिमर ड्रम आणि एमएस ड्रम यांची निर्मिती पिरॅमिड टेक्नोप्लास्टकडून केली जाते. कंपनीच्या उत्पादनांचा वापर रसायने, कृषी-रसायने, स्पेशालिटी केमिकल्स आणि औषध निर्माण या वेगाने वाढत असलेल्या उद्योग क्षेत्रांकडून केला जात आहे. कंपनीची गुजरात राज्यात सात निर्मिती प्रकल्प असून, नामांकित कंपन्या तिच्या अनेक वर्षांपासून ग्राहक आहेत. भारत रासायनिक आणि औषधी उद्योगासाठी जगातील एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे आणि या क्षेत्रातून पॅकेजिंग साधनांच्या वाढलेल्या मागणीचा लाभ उठवण्यासाठी कंपनीने तयारी केली आहे, असे पिरॅमिड टेक्नोप्लास्टचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार अगरवाल यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘एलआयसी’ला तिमाहीत ९,५४४ कोटींचा निव्वळ नफा
कंपनीने या प्रस्तावित सार्वजनिक विक्रीसाठी प्रत्येकी १५१ रुपये ते १६६ रुपये असा किंमत पट्टा निर्धारित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ९० समभागांसाठी आणि त्यानंतर ९० च्या पटीत समभागांसाठी बोली लावता येईल. या भागविक्रीमध्ये ९१.३० कोटी रुपये मूल्याचे नवीन समभाग विक्रीसाठी जारी केले जातील, तर ६१.७५ कोटी रुपये मूल्याचे समभाग हे कंपनीच्या विद्यमान भागधारकांकडून ‘ओएफएस’ स्वरूपात विकले जाणार आहेत. यातून उभ्या राहणाऱ्या निधीपैकी ४० कोटी रुपये कंपनीवरील विद्यमान कर्ज फेडण्यासाठी आणि उर्वरित खेळते भांडवल म्हणून खर्च केले जाईल. पीएनबी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस ही या भागविक्रीची व्यवस्थापन पाहत आहे, विक्रीपश्चात कंपनीचे समभाग मुंबई (बीएसई) तसेच राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) असे दोन्हींवर सूचिबद्ध केले जातील.