मार्च अखेरपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले
क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे. महारेराकडे नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करून दिलेले आहेत. आता १ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजूला ठळकपणे हा क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे. तसे परिपत्रक महारेराने नुकतेच जारी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे , इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप तत्सम समाज माध्यमे आणि विविध माध्यमांच्या मार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांची जाहिराती करीत असतात. कुठलेही माध्यम वापरून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये आता महारेरा क्रमांक आणि महारेरा संकेतस्थळासोबतच क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या क्यूआर कोडमुळे घर खरेदीदारांना या प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. घर खरेदीदार किंवा स्थावर संपदा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कुणालाही संबंधित प्रकल्पाबाबत विविध प्रकारची माहिती हवी असते. यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदवल्या गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का,
असा सर्व तपशील या क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकाला निर्णय घ्यायला मदत होणार आहे.

याशिवाय रेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकांना दर ३ महिन्याला आणि ६ महिन्याला विविध प्रपत्रांमध्ये माहिती त्यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी लागते . यातील प्रपत्र ५ अत्यंत महत्त्वाचे प्रपत्र आहे. हे दरवर्षी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक आहे. यात या प्रकल्पाची सद्यस्थिती आणि एकूण खर्च आणि बाकीचे तपशील उपलब्ध होतात . हे सर्व या क्यूआर कोड मुळे येथून पुढे घर बसल्या सहजपणे पाहता येणार आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qr code mandatory in all types of advertisements related to housing projects from 1 august 2023 vrd