मुंबई: क्वांट म्युच्युअल फंडात कथित ‘फ्रंट-रनिंग’ची कुप्रथा अनुसरल्याप्रकरणी ‘सेबी’ने चौकशी सुरू केल्यांनतर, गुंतवणूकदारांनी भीतीपायी त्याच्या समभागसंलग्न (इक्विटी) फंडातून १,३९८ कोटी रुपये काढून घेतल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या व्यवस्थापनाखाली मालमत्तेच्या तुलनेत दोन दिवसांत १.५ टक्के निधीचे निर्गमन झाले आहे.

क्वांट म्युच्युअल फंडातील गुंतवणूक व्यवस्थापनाच्या नियमित तपासणीदरम्यान ‘सेबी’ला ‘फ्रंट-रनिंग’ सूचित करणाऱ्या घडामोडी आणि काही अनियमितता आढळून आल्या. याची सखोल चौकशी करण्यासाठी ‘सेबी’कडून क्वांट म्युच्युअल फंडाच्या कार्यालयाची झडती आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. या भीतीपोटी आणि सावधिगिरीचा उपाय म्हणून काही गुंतवणूकदारांनी विविध योजनांमधील निधी काढून घेतला आहे.

हेही वाचा >>> स्पेक्ट्रम लिलावाच्या दुसऱ्या दिवशी ११,३०० कोटींची बोली

क्वांट म्युच्युअल फंडाकडे एकूण २१ योजनांमध्ये सुमारे ९०,००० कोटी रुपयांचा निधी आहे. सुमारे २०,००० कोटी रुपयांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेसह क्वांटकडून देशातील तिसरा सर्वात मोठा स्मॉल-कॅप फंड व्यवस्थापित केला जात आहे. ‘सेबी’च्या चौकशीपश्चात क्वाटंच्या विशेषत: मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंड आणि त्याच्या तरलतेबाबत चिंता वाढली आहे.

क्वांट म्युच्युअल फंडाचे संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी संदीप टंडन यांनी गुंतवणूकदारांच्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. फंडाकडे पुरेसा निधी असून, तरलता स्थितीही चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सेबी’ने चौकशी सुरू असली तरी एकंदर परिस्थिती सामान्य असून गत तीन दिवसांत विमोचनात खूप वाढ झाली नसल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> आणखी १.७ ते ३.६ गिगावॉट क्षमतेच्या डेटा सेंटरची गरज; देशात डिजिटल स्थित्यंतरामुळे वाढती मागणी

क्वांटची ‘स्ट्रेस टेस्ट’ काय सांगते?

नुकत्याच करण्यात आलेल्या क्वांट म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांमधील स्ट्रेस टेस्ट अर्थात ताण चाचणीनुसार, स्मॉल कॅप फंड पोर्टफोलिओचा अर्धा हिस्सा विकून त्यायोगे गुंतवणुकीतून बाहेर पडणाऱ्या गुंतवणूकदारांना पैसा परत करण्यास जवळपास २८ दिवसांपर्यंत विलंबावधी लागू शकतो. तर एक चतुर्थांश म्हणजेच २५ टक्के भाग विकण्यासाठी १४ दिवस लागतील. क्वांट मिड कॅप फंडाला ५० टक्के लिक्विडेट करण्यासाठी ९ दिवस आणि २५ टक्के निधी काढून घेण्यासाठी ५ दिवस लागतील. काही गुंतवणूक सल्लागार क्वांट म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करत राहण्याचा सल्ला देत आहेत आणि तर काहींची तूर्त थांबावे आणि ‘सेबी’ चौकशीतून काय पुढे येते याची वाट पाहावी, अशी भूमिका आहे.