मुंबई : देशाच्या रत्न व आभूषण उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)’ने नेतृत्वबदल घोषित केला असून, मावळत्या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष राजेश रोकडे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्ष म्हणून अविनाश गुप्ता यांची निवड केली आहे.
जीजेसीच्या २०२५-२६ सालासाठी कार्यकारिणी समितीची निवडणूक नुकतीच डिसेंबरमध्ये पार पडली असून, नवीन निर्वाचित २१ सदस्यीय कार्यकारिणीच्या वर्षारंभी झालेल्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. नवीन अध्यक्ष राजेश रोकडे हे नागपूरमधील १०० वर्षांचा वारसा लाभलेली सराफ पेढी – रोकडे ज्वेलर्सचे संचालक आहेत. याआधी जीजेसीचे उपाध्यक्ष आणि विधि समितीचे निमंत्रक अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. रत्न व दागिन्यांवर वस्तू व सेवा कर, आयात शुल्क, हॉलमार्किंग आणि अनेक गुंतागुंतीच्या विषयात सरकारदरबारी अनुकूल धोरणासाठी पाठपुरावा करण्यात त्यांचे योगदान राहिले आहे. अविनाश गुप्ता हे हैदराबादस्थित ममराज मुसद्दीलाल ज्वेलर्सचे प्रमुख असून, ते या उद्योगातील बड्या घाऊक विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करतात. मावळते अध्यक्ष संयम मेहरा यांनी नव्या नेतृत्वाकडून नवनवीन उपक्रम योजून जीजेसीला बळकटी दिली जाईल, असा विश्वास व्यक्त करीत त्यांचे स्वागत केले.