Ratan Tata: देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी एक नवा विक्रम केला आहे. रतन टाटा हे आनंद महिंद्रा यांना मागे टाकत सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे भारतीय उद्योगपती बनले आहेत. त्यांचे आता १२.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ नुसार, रतन टाटा यांचे भारतातील व्यावसायिक जगात सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.
३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३
३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ नुसार, भारतीय सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या उद्योजकांपैकी ८४ वर्षीय रतन टाटा पुढे आहेत आणि त्यांच्यानंतर आनंद महिंद्रा यांचे नाव आहे, ज्यांचे १०.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हुरुन इंडिया आणि ३६० वन वेल्थ यांनी संयुक्तपणे ३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ प्रकाशित केली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही १२ वी वार्षिक आवृत्ती आहे.
हेही वाचाः शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
रतन टाटा यांच्या फॉलोअर्समध्ये एका वर्षात ८ लाखांची वाढ
रतन टाटा यांचे सध्या १२.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि एका वर्षात त्यांच्या फॉलोअर्समध्ये ८ लाख नेटिझन्सने लक्षणीय वाढ केली आहे. रतन टाटा हे X (पूर्वीचे ट्विटर) वर फारसे सक्रिय नसतात, पण कोणतीही पोस्ट आली की, ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते.
हेही वाचाः हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये मुकेश अंबानींचे वर्चस्व कायम, अदाणींना मागे टाकत गाठलं ‘हे’ स्थान
मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
हुरुन इंडिया आणि ३६० वन वेल्थने आज ३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ जारी केली. या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावर विराजमान आहेत. जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्ग संशोधन अहवालामुळे अदाणी समूहाच्या एकूण संपत्तीत यंदा लक्षणीय घट झाली असून, वर्षाच्या सुरुवातीला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पाहिले जाणारे गौतम अदाणी आता दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.