Industrialist Ratan Tata Died at 86 : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी भावनिक पोस्ट केली आहे.
“आम्ही रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत. ते खरोखरच असामान्य नेतृत्व होते. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे केवळ टाटा समूहच नाही तर आपल्या राष्ट्राची रचना देखील घडली आहे”, असं टाटा सन्सचे अध्यक्ष पद्मभूषण एन. चंद्रशेखरन म्हणाले. ते पुढे म्हणाले, “टाटा समूहासाठी टाटा हे अध्यक्षांपेक्षा अधिक होते. माझ्यासाठी ते मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांनी उदाहरणाद्वारे प्रेरणा दिली. उत्कृष्टता, एकात्मता आणि नवकल्पना यांच्या अतूट बांधिलकीसह टाटा समूहाने त्यांच्या नेतृत्त्वाखाली जागतिक छाप सोडली आहे.”
“टाटा यांचे परोपकार आणि समाजाच्या विकासासाठीचे समर्पण लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्शून गेले आहे. शिक्षणापासून ते आरोग्यसेवेपर्यंत त्यांचे उपक्रम खोलवर रुजले आहेत. याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होईल. प्रत्येकाबरोबर टाटा नम्रतेने संवाद साधत असत. संपूर्ण टाटा परिवाराच्या वतीने मी त्यांच्या प्रियजनांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांचा वारसा आम्हाला प्रेरणा देत राहील. कारण आम्ही त्यांची तत्वे अतिशय उत्कटतेने जपण्याचा प्रयत्न करतो”, असंही ते म्हणाले.
— Tata Group (@TataCompanies) October 9, 2024
रतन टाटा यांचा परिचय
रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून १९५५ मध्ये डिप्लोमा केला. रतन टाटा यांनी १९६१ साली टाटा समूहाची प्रसिद्ध कंपनी टाटा स्टीलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ते १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकण्यासाठी गेले. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीही मिळवली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून १९९१ हे वर्ष भारतासाठी खूप महत्त्वाचे होते. देशात उदारीकरण आणि खासगीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडली आहे.