Who is Natarajan Chandrasekaran : प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मीठापासून विमानापर्यंत अनेक क्षेत्रात टाटा समूहाने क्रांती केली आहे. विविध पातळ्यांवर कार्य करत असताना रतन टाटा यांना एन. चंद्रशेखरन यांची मोलाची साथ लाभली आहे. एन. चंद्रशेखरन यांना रतन टाटांचे राईट हँन्ड म्हणून ओळखले जायचे. रतन टाटा यांच्या निधनानंतर एन. चंद्रशेखरन चर्चेत आले आहेत. त्यामुळे ते नक्की कोण? त्यांच्या करिअरची पार्श्वभूमीवर काय? त्यांचं शिक्षण आणि बालपण याविषयी जाणून घेऊयात.

एन. चंद्रशेखरन यांचा एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्म घेण्यापासून देशातील सर्वांत जुन्या आणि सर्वांत मोठ्या व्यावसियाक घराण्याचे अध्यक्ष बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास विलक्षण होता. त्यांनी टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून करिअरची सुरुवात केली होती. एन चंद्रशेखरन यांना व्यवसाय आणि मीडिया वर्तुळात चंद्रा म्हणून ओळखले जाते. त्यांनी २०१७ मध्ये टाटा सन्सचे सर्वोच्च पद स्वीकारले.

हेही वाचा >> Ratan Tata Death : रतन टाटांच्या निधनानंतर टाटा सन्सच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया; म्हणाले, “टाटा समूहच नाही तर राष्ट्राची रचना…”

एन. चंद्रशेखरन यांचा सुरुवातीचा काळ

१९६३ मध्ये तामिळनाडूमधील मोहनूर गावात एका कृषी कुटुंबात जन्मलेल्या एन चंद्रशेखरन यांचा लहानपणापासूनच संगणक प्रोग्रामिंगकडे कल होता. सरकारी शाळेत शिकल्यानंतर ते कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. तसंच, त्यांनी तिरुचिरापल्ली येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स (एमसीए) पूर्ण केले.

एन. चंद्रशेखरन यांचं करिअर

अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर नटराजन चंद्रशेखरन यांनी १९८७ मध्ये टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून सामील झाले. त्यानंतर दोन दशकांत त्यांनी बरीच प्रगती केली. सप्टेंबर २००७ मध्ये त्यांची TCS बोर्डावर सहनियुक्ती करण्यात आली आणि कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने एन चंद्रशेखरन ऑक्टोबर २००९ मध्ये सीईओ बनले. वयाच्या ४६ व्या वर्षी ते एस. रामादोराई यांच्यानंतर टाटा समूहाचे सर्वात तरुण सीईओ बनले.

नटराजन चंद्रशेखरन यांचे योगदान

नटराजन चंद्रशेखरन यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा समूहाने २०२२ मध्ये ६४ हजार २६७ कोटी रुपयांचा एकत्रित नफा मिळवला आहे. २०१७ मध्ये हाच नफा ३६ हजार ७२८ कोटी रुपयांचा होता. गेल्या ५ वर्षांत टाटा समूहाचा महसूल ६.३७ लाख रुपयांवरून ९. ४४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

नटराजन चंद्रशेखरन यांचा पगार

फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एन चंद्रशेखरन यांनी २०१९ मध्ये ६५ कोटी रुपयांचे वार्षिक वेतन पॅकेज घेतले. २०२१-२२ मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षांना १०९ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले होते. यासह, ते भारतातील सर्वात जास्त पगार घेणारे व्यावसायिक अधिकारी होते .

नटराजन चंद्रशेखरन यांची संपत्ती

२०२० मध्ये, एन चंद्रशेखरन यांनी मुंबईच्या पेडर रोड लक्झरी टॉवरमध्ये ९८ कोटी रुपयांना डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला. सहा हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या फ्लॅटचे भाडे महिन्याला २० लाख रुपये होते.

नटराजन चंद्रशेखरन यांचे कुटुंब

एन चंद्रशेखरन यांच्या पत्नीचे नाव ललिता आणि मुलाचे नाव प्रणव चंद्रशेखरन आहे.