मुंबई: नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन दिवसांत वेगवेगळय़ा चार सहकारी बँकांवर रिझव्र्ह बँकेने दंड ठोठावला. दंडाची कारवाई झालेल्या या बँकांमध्ये महाराष्ट्रातील तीन बँका आहेत.
मुंबईतील साहेबराव देशमुख सहकारी बँक आणि साताऱ्याच्या कर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँकेला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड रिझव्र्ह बँकेने ठोठावला आहे. पुणेस्थित शरद सहकारी बँकेला सहा लाख रुपयांचा, तर सोलन, हिमाचल प्रदेश येथील बागघाट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला नियमभंगाबद्दल आठ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पर्यवेक्षणात्मक कृती आराखडय़ाअंतर्गत रिझव्र्ह बँकेने विशिष्ट निर्देशांचे आदेश देऊन त्याचे पालन झाले नसल्याचे आढळून आल्याने बागहाट अर्बनला दंड ठोठावण्यात आला आहे. साहेबराव देशमुख सहकारी बँकेच्या बाबतीत, तिने विलंबाने फसवणूक आणि गैरव्यवहाराची प्रकरणे रिझव्र्ह बँकेकडे नोंदवली, असे मध्यवर्ती बँकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या व्यतिरिक्त, शरद सहकारी बँकेत खातेदारांच्या ‘केवायसी’च्या नियतकालिक नूतनीकरणाची एक प्रणाली स्थापित करण्यात अपयश आढळून आले. कर्नल आर.डी.निकम सैनिक सहकारी बँकेने ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये दहा वर्षांहून अधिक दावेरहित खात्यांमधील शिल्लक हस्तांतरित केलेली नाही, असे रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे.