RBI Cuts Repo Rate by 25 bps: गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने याआधीची व्याजदर कपात थेट मे २०२०मध्ये जाहीर केली होती. याशिवाय गेल्या दोन वर्षांत आरबीआयनं व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. आता मात्र आरबीआयकडून व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यामुळे त्याचा शेअर बाजारासोबतच भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होतो, यावर अर्थतज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किती झाली व्याजदर कपात?

रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मोनेटरी पॉलिसी कमिटी अर्थात सीपीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आरबीआयने २५ बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे आता व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच आरबीआयनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी काळात गृह व वाहन कर्जे स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुंतवणूक, खर्च वाढवण्यावर भर…

आरबीआयच्या एमपीसी बैठकीत झालेला हा निर्णय कर्ज स्वस्त होण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत घरासाठी घ्यावे लागणारे कर्ज, वाहनासाठी घ्यावे लागणारे कर्ज यांच्यावरचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. अर्थात, ही कर्जे महाग होऊ शकतात. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी या माध्यमातून लोकांच्या हाती जास्त पैसा शिल्लक राहिल्यामुळे त्यातून गुंतवणूक वाढू शकते, बाजारात पैसा येऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हा निर्णय जाहीर करताना RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, “गेल्या काही वर्षांत या पद्धतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: करोना काळातील आव्हानांचा भारतीय अर्थव्यवस्थेला सामना करता आला आहे. यानंतर सरासरी महागाईचा दर कमी झाला आहे. व्याजदरासंदर्भातील या धोरणाचा अवलंब केल्यानंतर आरबीआयकडून नियोजित पद्धतीनेच मार्गक्रमण करण्यात आलं”, असं ते म्हणाले.

जागतिक बाजारपेठेत काय घडतंय?

दरम्यान, गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. डोनार्ड ट्रम्प यांनी नवे टेरिफ प्लॅन जाहीर केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. कॅनडा, मेक्सिको आणि चीनसाठी हे टेरिफ दर जाहीर झाले. त्यापैकी कॅनडा आणि मेक्सिकोवरील टेरिफ दर लागू करण्याची प्रक्रिया एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या अनिश्चिततेमुळे डॉलर मोठ्या प्रमाणावर वधारला असून जगातील इतर मोठ्या चलनांनी नांगी टाकली आहे. भारतीय रुपयानं ८७ या आत्तापर्यंतच्या नीचांकापर्यंत घसरण नोंदवली आहे.

देशाचा आर्थिक विकासदर ६.७ टक्के!

दरम्यान, RBI च्या MPC बैठकीतील चर्चेनंतर देशाचा आर्थिक विकासदर ६.७ टक्के इतका अंदाजित करण्यात आला आहे. त्याशिवाय, घाऊक बाजारपेठेतील महागाईचा दर हा ४.२ टकक्यांच्या आसपास राहील, असं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं आहे.