मुंबई : देशाच्या विकास दराचा अंदाज रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी ७.२ टक्क्यांवरून कमी करून ६.६ टक्क्यांवर आणला आहे. आर्थिक क्रियाकलापात होत असलेली घसरण आणि खाद्यवस्तूंची वाढती महागाई यामुळे विकास दराचा अंदाज घटविण्यात आला आहे.
देशाचे सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाढीचा दर चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर तिमाहीत ५,.४ टक्के नोंदविण्यात आला. गेल्या सात तिमाहीतील हा नीचांक दर आहे. रिझर्व्ह बँकेने या तिमाहीसाठी ७ टक्के विकास दराचा अंदाज वर्तविला होता. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर बोलताना बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, विकास दर हा अपेक्षेपेक्षा कमी आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत देशांतर्गत आर्थिक क्रियाकलापाने तळ गाठला. तेव्हापासून त्यात सुधारणा होत असून, सणासुदीत्या काळात क्रियाकलापात वाढ झालेली आहे.
हेही वाचा >>> महागाईचे चटके वाढणार; रिझर्व्ह बँकेचा चालू आर्थिक वर्षासाठी ४.९ टक्क्यांचा अंदाज
खरीप हंगामातील उत्पादन चांगले झाल्याने कृषी क्षेत्राच्या वाढीला बळ मिळाले आहे. धरणांतील पाण्याचा उच्चांकी साठा आणि रब्बी हंगामात झालेल्या चांगल्या पेरण्या कृषी क्षेत्रात आणखी भर घालतील. सरकारकडून भांडवली खर्चात वाढ अपेक्षित असून, सिमेंट, लोखंड आणि पोलाद उद्योगाला यामुळे गती मिळेल. खाणकाम आणि विद्युतनिर्मिती क्षेत्रातही पावसाळा संपल्याने सुधारणा होईल, असे दास यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील मागणी वाढत आहे. याचवेळी शहरी भागातील मागणी आधारबिंदू जास्त असल्याने काहीशी मंदावलेली दिसत आहे. सरकारकडून खर्चात वाढ होत आहे. गुंतवणुकीतही वाढ होण्याची शक्यता आहे. – शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक