मुंबई: देशाची चालू खात्यावरील तूट जुलै ते सप्टेंबर या तिमाही ११.२ अब्ज डॉलरवर पोहोचली असून, ती सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत १.२ टक्क्यांवर गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती ११.३ अब्ज डॉलर म्हणजेच जीडीपीच्या तुलनेत १.३ टक्का पातळीवर होती. त्यामुळे सरलेल्या तिमाहीत ती कमी झाली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दिली. उल्लेखनीय म्हणजे जानेवारी ते मार्च २०२४ या आधीच्या तिमाहीत चालू खात्यावर ४.६ अब्ज डॉलरचे (जीडीपीच्या तुलनेत ०.५ टक्क्यांचे) आधिक्य होते.
हेही वाचा >>> परकीय चलन गंगाजळी घटून सात महिन्यांच्या नीचांकी
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत चालू खात्यातील तूट २१.४ अब्ज डॉलर म्हणजेच जीडीपीच्या १.२ टक्के राहिली आहे. जी वर्षभरापूर्वी म्हणजेच एप्रिल-सप्टेंबर २०२३ मध्ये २०.२ अब्ज डॉलर (जीडीपीच्या १.२ टक्के) होती. व्यापारी तूट मोठ्या प्रमाणावर वाढली असून ती २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ७५.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जी २०२३-२४ मध्ये ६४.५ टक्के नोंदवली गेली होती. दुसऱ्या तिमाहीत सेवा क्षेत्राच्या निव्वळ निर्यात उत्पन्नात वाढ होऊन त्यामाध्यमातून ४४.५ अब्ज डॉलर मिळाले आहेत, जी वर्षभरापूर्वी ३९.९ अब्ज डॉलर होती. संगणकीय सेवा, व्यवसाय सेवा, पर्यटन सेवा आणि वाहतूक सेवा क्षेत्रात वाढ झालेली आहे.
हेही वाचा >>> Gold Silver Rate Today : आजचा सोन्याचा दर काय आहे? जाणून घ्या मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव
दुसऱ्या तिमाहीत निव्वळ परकीय संस्थात्मक गुंतवणुकीत मोठी वाढ होऊन, ती १९.९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती ४.९ अब्ज डॉलर होती. परदेशस्थ भारतीयांनी दुसऱ्या तिमाहीत ३१.९ अब्ज डॉलर मायदेशी पाठविले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ही रक्कम २८.१ अब्ज डॉलर होती. त्यात आता वाढ नोंदविण्यात आली आहे. निव्वळ थेट परकीय गुंतवणूक ४.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती ३.९ अब्ज डॉलर होती, असे रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे.