आशियातले सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनांशियल सर्व्हिसेसच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) Jio Financial Services च्या संचालक पदावर मुकेश अंबानींची मुलगी आणि रिलायन्स रिटेलची संचालक ईशा अंबानी यांच्या नियुक्तीवर मंजुरीची मोहोर लावली आहे. ईशा अंबानीसह संचालक म्हणून अंशुमन ठाकूर आणि हितेश कुमार सेठिया यांच्याही नावाला मंजुरी दिली आहे.
भारतात Jio ची संकल्पना आणण्यात ईशा अंबानीचा खूप मोठा वाटा आहे. मुकेश अंबानींची मुलगी ईशा रिलायन्स रिटेलची जबाबदारी सांभाळते आहे आणि त्याचा विस्तारही करते आहे. ईशाने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमध्ये पदवीही घेतली आहे. त्याचप्रमाणे स्टँडफोर्ड विद्यापीठातून MBA ची पदवीही तिने घेतली आहे.
मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर्स ऑगस्ट २०२३ या महिन्यात लिस्ट झाले होते. लिस्टिंगनंतर शेअर्स काही प्रमाणात घसरले होते. मात्र ईशा अंबानी यांच्या संचालक पदी नियुक्तीला आरबीआयने मंजुरी दिल्यानंतर Jio Financial च्या शेअर्समध्ये १.३२ टक्के वाढ झाली आहे. आज हा शेअर २२७.१० रुपयांच्या लेव्हलवर बंद झाला. इकॉनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
Jio Financial Services चं मार्केट कॅपिटलायझेशन १.४४ लाख कोटी रुपये आहे. कंपनीचा शेअर ५२ व्या आठवड्यातला हाय लेव्हल २६६.९५ रुपये इतका होता. तर लो लेव्हलला तो २०२.८० रुपये इतका गेला होता. ईशा अंबानीला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात नुकतंच सहभागी करण्यात आलं. याबाबतची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली होती. रिलायन्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या नावाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.