मुंबई : बँकांनी संभाव्य संरचनात्मक तरलतेची समस्या टाळण्यासाठी पतपुरवठा आणि ठेवींच्या वाढीमधील उत्तरोत्तर वाढत्या तफावतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंगळवारी केले. आजचे भारतीय तरुण महत्त्वाकांक्षी आहेत. ते त्यांच्या पैशांच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या बाजारपेठांकडे आकर्षित होत आहेत. यात काहीही गैर नाही आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आणि सकारात्मक विकास आहे, असे शक्तिकांत दास यांनी स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
तथापि बँकांना सावध केले जात आहे की त्यांनी या परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे. तूर्त तरी अडचणीची स्थिती नाही, परंतु भविष्यात ही संरचनात्मक तरलतेची समस्या बनू शकते, अशी पुस्ती दास यांनी जोडली. देशातील बँकांकडून वितरित कर्जे वार्षिक आधारावर २६ जुलैपर्यंत १३.७ टक्के दराने वाढली आहेत, तर बँकांच्या ठेवींमधील वाढीचा दर १०.६ टक्के आहे, असे रिझर्व्ह बँकेकडून प्रसृत ताजी आकडेवारी सांगते. अर्थव्यवस्थेतील निकोप वाढ आणि वाढत्या शहरी उपभोगामुळे कर्जाच्या मागणीत वाढ झाली आहे, परंतु ठेवीतील वाढीचा वेग मंदावला आहे.
हेही वाचा : हिंदुस्तान झिंककडून प्रति समभाग १९ रुपयांचा लाभांश, भागधारकांमध्ये ८,०२८ कोटी वितरित करण्याचा निर्णय
तंत्रज्ञानामुळे पतपुरवठ्यात वाढ आणि वितरणही जलद गतीने शक्य झाले असले तरी, भौतिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर ठेवी संग्रहणाचे काम मागे पडत असल्याचे दिसते असे दास म्हणाले. त्यामुळे नावीन्यपूर्ण योजना आणि सेवांद्वारे बँकांनी अधिकाधिक ठेवी गोळा केल्या पाहिजेत, या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
© The Indian Express (P) Ltd