मुंबई : पुन्हा एकदा व्याजदर वाढविले जाण्याच्या सार्वत्रिक अपेक्षेच्या विपरीत, पतधोरण समितीकडून आर्थिक वर्षातील पहिल्या बैठकीत सर्वसहमतीने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा गुरुवारी अनपेक्षित निर्णय आला. हा निर्णय म्हणजे व्याजदर वाढीचे चक्र थांबले, असे समजले जाऊ नये, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आवर्जून स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने मे २०२२ पासून सलग सहाव्यांदा व्याजदरात अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. मात्र, ताज्या बैठकीने व्याजदर वाढीची ही मालिका खंडित केली. रिझर्व्ह बँकेकडून पाव टक्का व्याजदर वाढ होईल, असा अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. परंतु, रिझर्व्ह बँकेने दरवाढ न करता सर्वांनाच धक्का दिला आहे. सध्या रेपो दर ६.५ टक्के आहे, त्यात तूर्त कोणताही बदल केला गेलेला नाही.

हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; पेन्शन व्यवस्थेतील सुधारणेसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

पतधोरणाच्या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना दास म्हणाले की, जर आजच्या पतधोरणाचे फक्त एका ओळीत वर्णन करायचे झाले तर… हा एक तात्पुरता थांबा असून, खुंटा मात्र बदललेला नाही, असेच ते करता येईल. पुढे पुस्ती जोडत ते म्हणाले, ‘महागाई मोठ्या प्रमाणात खाली आणण्याचे काम अजूनही संपलेले नाही. आतापर्यंत केलेल्या व्याजदर वाढीचा नेमका परिणाम काय झाला, हे रिझर्व्ह बँक तपासत आहे.’

किरकोळ महागाईचा दर ४ टक्क्यांवर खाली आणण्याचे रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे. सध्या हा दर ६ टक्क्यांच्या पातळीवर आहे. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय केवळ या बैठकीपुरता मर्यादित आहे. गरज पडल्यास त्यात पुढे वाढ केली जाऊ शकते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

हेही वाचा – CNG-PNG Price: नव्या फॉर्म्युल्यामुळे आता CNG-PNG स्वस्त होणार, किमती 10 टक्क्यांनी घटणार; नेमकं गणित समजून घ्या

चालू आर्थिक वर्षात विकास दराचा अंदाज वाढवून ६.५ टक्के करण्यात आला आहे. खनिज तेलाची सरासरी आयात किंमत पिंपामागे ९० डॉलरवरून, ८५ डॉलरवर घसरेल या शक्यतेच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असे रिझर्व्ह बँक, डेप्युटी गव्हर्नर, मायकेल पात्रा म्हणाले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi governor shaktikanta das explanation on interest rate hike says its only a temporary stop ssb