नवी दिल्ली : जगभरात चलनवाढीने पुन्हा डोके वर काढले असून जागतिक स्तरावर वाढ मंदावण्याचा धोका अजूनही कायम असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवी दिल्लीत गुरुवारी एका कार्यक्रमात चिंता व्यक्त केली. किरकोळ आणि घाऊक महागाई दरात पुन्हा वाढ झाली असून त्याचा परिणाम विकासावर होऊ शकतो, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

दीर्घकाळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेनमधील संघर्षामुळे जगभरात पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय निर्माण झाला आणि त्यामुळे महागाई वाढली. परिणामी, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी पतविषयक धोरण कठोर करण्याचा पवित्रा अनुसरला आहे. रिझर्व्ह बँकेने पतधोरणाच्या माध्यमातून महागाई कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र देशांतर्गत प्रतिकूल परिस्थिती आणि जागतिक घडामोडींमुळे पुन्हा एकदा महागाई वाढण्याची शक्यता असून, अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याचा धोका कायम आहे. भू-राजकीय संघर्ष आणि त्याचे आर्थिक परिणाम, वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता आणि हवामानातील बदल हे यासाठी मुख्यतः कारणीभूत आहेत, असे दास म्हणाले रिझर्व्ह बँकेने सलग दहाव्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला. किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याच्या मध्यवर्ती बँकेच्या प्रयत्नाला खाद्यान्नातील महागाईमुळे आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आता येत्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडणार आहे.

Story img Loader