मुंबई : अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती मंदावण्यामागे अनेक घटक कारणीभूत असून, केवळ रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरामुळे वाढ खुंटलेली नाही, असे रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंगळवारी त्यांच्या अखेरच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले.
रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेची वाढ आणि महागाई यांचे संतुलन करण्याचे महत्त्वाचे काम करते. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत म्हणजेच करोना महासाथीबरोबरच युक्रेन आणि आखाती युद्धांसारख्या मोठ्या भू-राजकीय उलथापालथींच्या काळात दास यांनी महागाई कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. दास यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण समितीने सलग अकराव्यांदा व्याजदर जैसे थे राखले. परिणामी दोन वर्ष व्याजदर उच्चांकी पातळीवर कायम होते. मात्र सद्यस्थिती आणि भविष्यातील दृष्टीकोन लक्षात घेऊन आर्थिक धोरण शक्य तितके योग्य लवचिक राखण्याचा प्रयत्न केला आहे, असे दास म्हणाले.
हेही वाचा : Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
लोकांना व्याजदर-निर्धारणाच्या मुद्द्याकडे सोप्या पद्धतीने न पाहण्याचे आवाहन करत दास म्हणाले, की अर्हतव्यवस्थेच्या वाढीवर अनेक घटकांचा प्रभाव असतो. केवळ रेपो दर एकमेव परिणाम करणारा घटक नसतो. आतापर्यंत रिझर्व्ह बँक आणि पतधोरण समितीने परिस्थितीनुसार सर्वोत्तम उपलब्ध पर्यायांचा विचार केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था लवचिक आणि मजबूत आहे. शिवाय जागतिक पातळीवरील बाह्य आव्हानांना अतिशय प्रभावीपणे सामोरे जाण्याची तिच्यात क्षमता आहे. त्यांच्या उत्तराधिकारीबद्दल दास म्हणाले की, संजय मल्होत्रा यांना खूप मोठा अनुभव असून सर्वोत्तम कामगिरी बजवातील. सहा वर्षांच्या कालावधीत रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय यांच्यात चांगला समन्वय राहिला, असेही त्यांनी नमूद केले.