मुंबई : अनिश्चित आर्थिक स्थिती आणि महागाईचा दर ५ टक्क्यांच्या आसपास असल्याने तूर्तास व्याज दरकपातीची चर्चाही घाईची ठरेल, असे सुस्पष्ट प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी येथे केले.
एका दूरचित्र-वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दास म्हणाले, ‘जागतिक पातळीवर आणि भारतात आर्थिक स्थिती सध्या अनिश्चिततेची आहे. निदान आपल्याकडे तरी व्याज दरकपातीवर चर्चेची वेळ अजून आलेली नाही. किरकोळ महागाईचा दर अद्याप ५ टक्क्यांच्या जवळ आहे. जून महिन्यासाठीही तो ५ टक्क्यांच्या आसपास राहील, असा आमच्या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. त्यामुळे व्याज दरकपातीचा मुद्दा घाईचा ठरेल, असे मला वाटते. भविष्यातील गोष्टींबाबत चुकीचा संकेत देऊन बाजारातील घटक, अन्य सहभागी आणि इतरांना चुकीच्या गाडीत बसण्यास मी प्रवृत्त करणार नाही.’
हेही वाचा >>> Stock Market Update : नफावसुलीमुळे प्रमुख निर्देशांक नकारात्मक
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीतील सहापैकी दोन सदस्यांनी गेल्या महिन्यातील पतधोरण बैठकीत व्याज दरकपातीच्या बाजूने मत दिले होते. कठोर पतधोरणामुळे आर्थिक विकासाला बाधा येत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. पतधोरण समितीने सुमारे पावणेदोन वर्षांपासून बँकांच्या व्याजदराला प्रभावित करणारा ‘रेपो दर’ ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.
सरकारकडून वित्तीय शिस्तीच्या मार्गाने वाटचाल सुरू असून, गोष्टी योग्य दिशेने पुढे जात आहेत. त्यामुळे देशाच्या पतमानांकनात सुधारणा जी आधीच व्हायला हवी होती, ती आता होईल अशी शक्यता दिसून येते. – शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक