RBI Governor speaks on Trump tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापर युद्धाचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर पाहायला मिळत आहे. यादरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन हा वेगाने बदलत आहे आणि गेल्या काही काळात केलेल्या व्यापार शुल्कासंबंधी बादलांमुळे अनिश्चितता वाढली आहे, यामुळेच विविध प्रदेशामधील अर्थव्यवस्था या जागतिक विकास आणि महागाईला नवीन अडथळा ठरत आहेत.

मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना मल्होत्रा यांनी आज रेपो दरात २५ बेसिस पाँइट्सची म्हणजेच ६ टक्क्यांची कपात केली आहे. यावेळी बोलताना मल्होत्रा म्हणाले की, अनिश्चिततेमुळे घरगुती आणि व्यावसायिक स्तरावरील खर्च आणि गुंतवणूक यासंबंधीच्या निर्णयांवर परिणाम होईल आणि यामुळे विकासात अडथळा येईल. “दुसरे म्हणजे व्यापारातील संघर्षामुळे जागतिक विकासाला होणार्‍या नुकसान यामुळे देशांतर्गत विकासाला देखील अडथळा येईल. तिसरे, वाढीव व्यापारशुल्काते एकूण निर्यातीवर नकारात्मक परिणाम होतील.”

“जागतिक अर्थव्यवस्थेसाठी वर्षाची सुरूवात ही चिंता वाढवणारी झाली आहे. व्यापार संघर्षांबाबतच्या काही चिंता या प्रत्यक्षात येताना दिसत आहेत, ज्यामुळे जागतिक समुदाय अस्वस्थ होत आहे,” असेही मल्होत्रा म्हणाले आहेत.

“एकंदरीत जेव्हा जागतिक व्यापार आणि धोरणातील अनिश्चितता विकासाला अडथळा ठरेल, याचा परिणाम देशांतर्गत महागाईवर होत असताना आपण सतर्क राहण्याची गरज असली तरी, तो फार चिंतेचा विषय ठरणार नाही अशी अपेक्षा आहे,” असे मल्होत्रा म्हणाले.

मल्होत्रा पुढे बोलताना म्हणाले की, महागाईचा धोका हा दुतर्फा आहे. अनिश्चितता ही कदाचित करन्सी प्रेशर्स वाढवणारी ठरेल आणि त्यामुळे इंपोर्टेड महागाही येईल. तर दुसरीकडे जागतिक विकासात मंदी आल्याने कमोडीटी आणि कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी होऊ शकतात. ज्यामुळे महागाईवरील दबाव कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले.