Deposit or exchange Rs 2000 Note : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँक शाखांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरची अंतिम मुदत दिली होती, जी आता संपली आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबर होती, ती ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती. पण ७ ऑक्टोबरनंतर रिझर्व्ह बँकेने ती वाढवली नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीकडे २ हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिझव्र्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बहुतांश लोकांनी त्यांच्या २ हजार रुपयांच्या नोटा बदलल्या आहेत, परंतु तुम्हाला तसे करता आले नसेल तर काळजी करू नका. अशा परिस्थितीसाठी आरबीआयने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.
२ हजारांच्या नोटा अजून बदलल्या नसल्यास काय करावे?
७ ऑक्टोबरपर्यंत बँकेच्या शाखेत जाऊन २ हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नाही, तर काळजी करू नका. ८ ऑक्टोबर २०२३ आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या २ हजार रुपयांच्या नोटांचे काय करू शकता हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले आहे.
हेही वाचाः Money Mantra : Axis Bank ने लॉन्च केले नंबर नसलेले क्रेडिट कार्ड, कसे वापरता येणार? जाणून घ्या
- ८ ऑक्टोबर २०२३ पासून बँकेच्या शाखांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याचे/बदलण्याचे काम थांबले आहे.
- ज्या व्यक्ती/संस्था २ हजारच्या नोटा शिल्लक आहेत, ते RBI च्या १९ इश्यू ऑफिसला भेट देऊन त्या बदलू शकतात.
- RBI च्या १९ इश्यू ऑफिसमध्ये एकावेळी फक्त २० हजार रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात.
- तुम्हाला भारतातील तुमच्या बँक खात्यात २ हजार रुपयांच्या नोटा जमा करायच्या असतील तर तुम्ही RBI च्या १९ इश्यू ऑफिसमधूनही हे करू शकता. खात्यात जमा केल्यावर २० हजार रुपयांची कमाल मर्यादा लागू होणार नाही.
- भारतात उपस्थित असलेल्या व्यक्ती/संस्था देखील भारतीय पोस्टद्वारे RBI च्या १९ जारी कार्यालयांना २ हजार रुपयांच्या नोटा पाठवू शकतात. ही रक्कम त्यांच्या भारतातील बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे.
- RBI/सरकारने जाहीर केलेले नियम २ हजार रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा करण्याच्या या प्रक्रियेवर लागू होतील. यासाठी आरबीआयच्या सूचनेनुसार वैध ओळखपत्रासह सर्व आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतील.
- RBI च्या १९ इश्यू ऑफिसमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा/बदलण्याची ही सुविधा पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहील.
नोटा बदलण्यात/जमा करण्यात उशीर करू नका: RBI
भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या इश्यू ऑफिसद्वारे २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या या प्रणालीसाठी अद्याप कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नसली तरी आपल्या मागील परिपत्रकात सर्वसामान्यांना उर्वरित २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचा सल्ला दिला होता. शक्य तितक्या लवकर नोटा जमा करणे किंवा बदलणे आवश्यक आहे. २ हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. न्यायालये, कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सी, कोणत्याही तपासात गुंतलेले सार्वजनिक अधिकारी किंवा सरकारी विभाग जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा RBI च्या १९ इश्यू ऑफिसमधून २ हजार रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलू शकतात. त्यांच्यावर कोणतीही मर्यादा लागू होणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या ९६ टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्या होत्या.