मुंबई: ‘पीअर-टू-पीअर लेंडिंग’ अर्थात पी २ पी कर्ज वितरण मंचांशी संबंधित निर्देशांमधील काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी या क्षेत्रातील चार बँकेतर वित्तीय कंपन्यांना एकूण ७६.६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने या संबंधाने २०१७ मध्ये जारी केलेल्या निर्देशातील तरतुदींचे पालन न केल्याबद्दल फेअरॲसेट्स टेक्नॉलॉजीज इंडियावर ४० लाख रुपयांचा आणि ब्रिज फिनटेक सोल्युशन्स आणि रंग दे पी२पी फायनान्शियल सर्व्हिसेसवर प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चौथी संस्था विजनरी फायनान्सपीअर हिच्यावर १६.६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे असेही मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. ‘पी २ पी लेंडिंग’ हे एक विनातारण कर्ज देण्याचे नियमनाधीन ऑनलाइन व्यासपीठ आहे. जेथे कर्जदाते आणि कर्जदार यांना एका मंचावर आणून त्यांच्यात परस्पर देवघेवीचे व्यवहार घडवून आणले जातात. त्यामुळे ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी खर्च वजा वरकड आहे आणि जास्त परतावा मिळविण्यासाठी थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे अशांना हा मंच अतिरिक्त उत्पन्नाची संधी प्रदान करतो. त्याचवेळी ज्यांना तातडीने पैशाची निकड आहे, त्यांना ते उसनवारीचा पर्याय खुला करते.

Story img Loader