मुंबई : चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा विकास दर ७.२ टक्के आणि महागाई दर सरासरी ४.५ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने गुरुवारी वर्तविला. भूराजकीय तणाव, आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठांतील अस्थिरता यांचा धोका या घटकांना विचारात घेऊनही, चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाढीचा दर ७.२ टक्के राहील, असे तिने स्पष्ट केले.
हेही वाचा >>> रिझर्व्ह बँकेच्या धोरण कठोरतेवर नाराजी; ‘सेन्सेक्स’ची ५८१ अंशांनी घसरंगुडी
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील विकासदराचे अनुमान, पूर्वअंदाजित ७.३ टक्क्यांवरून, ७.१ टक्क्यांपर्यंत मात्र रिझर्व्ह बँकेने घटवला आहे. तिच्या मते दुसऱ्या तिमाहीत तो ७.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ७.३ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ७.२ टक्के राहील. महागाईबाबत बोलताना दास म्हणाले की, समाधानकारक मोसमी पावसामुळे खाद्यवस्तूंची महागाई कमी होण्याची शक्यता आहे. खरिपाच्या पेरण्यांमध्ये चांगली वाढ दिसत आहे. जागतिक पातळीवर खाद्यवस्तूंच्या किमती कमी होत आहेत. या किमती मार्चपासून वाढत होत्या. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत महागाईचा दर ४.९ टक्के नोंदविण्यात आला. तरी संपूर्ण आर्थिक वर्षासाठी तो सरासरी ४.५ टक्के राहील. तो दुसऱ्या तिमाहीत ४.४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.७ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.३ टक्के राहील.