RBI New Feature UPI ICD: भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने डिजिटल बँकिंग सुविधा आणखी सुलभ करण्यासाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे, ज्याद्वारे ग्राहक आता डेबिट कार्डशिवायदेखील एटीएममध्ये पैसे जमा करू शकणार आहेत. या नवीन सुविधेला UPI इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट (UPI-ICD) असे नाव देण्यात आले आहे. UPI द्वारे रोख जमा करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद करणे हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून ग्राहकांना कार्डची गरज भासणार नाही. आता ग्राहक त्यांचा मोबाइल नंबर किंवा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस (VPA) वापरून रोख रक्कम जमा करू शकतात.
ही सुविधा ज्या एटीएममध्ये रोख जमा करणे आणि काढणे अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी वापरता येणार आहे. NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या मते, या नवीन फीचरमुळे प्रत्येकाला बँकिंग सेवा सुलभपणे वापरता येणार आहेत. आरबीआयचे हे पाऊल डिजिटल पेमेंट आणि कार्डलेस बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक मोठे पाऊल आहे.
UPI-ICD फीचर नेमके कसे काम करते?
आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 दरम्यान UPI इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट (UPI-ICD) सेवा सुरू केली. हे नवीन फीचर ग्राहकांना UPI द्वारे रोख रक्कम जमा करण्याची सुविधा प्रदान करते, ज्यामुळे डेबिट कार्डची गरज भासत नाही. एटीएम बँकेचे असो किंवा व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटरचे असो, ग्राहक थेट एटीएममधून त्यांच्या स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या खात्यात रोख जमा करू शकतात.
UPI-ICD चा वापर नेमका कसा करायचा?
हे फीचर वापरण्यास खूप सोपे आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे.
१) UPI-ICD फीचरला सपोर्ट करणाऱ्या ATM वर जा.
२) एटीएम स्क्रीनवर कॅश डिपॉझिट ऑप्शन निवडा.
३) तुमचा UPI लिंक केलेला मोबाइल नंबर किंवा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस (VPA) एंटर करा.
४) एटीएमच्या कॅश डिपॉझिट स्लॉटमध्ये रोख रक्कम ठेवा.
५) एटीएम मशीन रोख रकमेवर प्रक्रिया करेल आणि निवडलेल्या खात्यात जमा करेल.
ही सुविधा कोणत्या एटीएममध्ये उपलब्ध आहे?
ही सुविधा सध्या फक्त त्या एटीएमवर उपलब्ध आहे जिथे कॅश रिसायकल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. म्हणजेच अशा एटीएम मशीन्स, ज्यात रोख जमा करणे आणि काढणे या दोन्हीची सुविधा असतात. बँका हळूहळू त्यांच्या सर्व एटीएममध्ये हे फीचर लागू करतील, जेणेकरून अधिकाधिक ग्राहकांना याचा लाभ घेता येईल.
कार्डलेस बँकिंगच्या दिशेने आणखी एक पाऊल
UPI-ICD फीचर हे २०२३ मध्ये सादर केलेल्या UPI कार्डलेस कॅश विड्रॉअल सुविधेचा विस्तार आहे. यापूर्वी एटीएममधून डेबिट कार्डशिवाय UPI द्वारे पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली होती, पण आता रोख जमा करण्याची प्रक्रियादेखील डिजिटल आणि कार्डलेस करण्यात आली आहे. बँकिंग प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद करण्याच्या दिशेने हे पाऊल एक महत्त्वाचे पाऊल आहे.
NPCI काय म्हणाले?
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने म्हटले आहे की, ग्राहक आता त्यांचा UPI लिंक केलेला मोबाइल नंबर, व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस (VPA) आणि IFSC कोड वापरून ATM मध्ये रोख जमा करू शकतात. यामुळे बँकिंग प्रक्रिया केवळ सोपी झाली नाही तर अधिक सुलभदेखील झाली आहे, जेणेकरून प्रत्येक जण त्याचा लाभ घेऊ शकेल.
आरबीआयचे हे नवे फीचर कार्डलेस बँकिंग आणि बँकिंग प्रक्रिया अधिक उपयुक्त बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.