How to access RBI WhatsApp Channel : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांचे अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल सुरू केले असून याच्या माध्यमातून देशभरातली नागरिकांना आर्थिक क्षेत्रातील माहिती सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे. दुर्गम भागांमध्ये किंवा कमी संपर्क असलेल्या भागांमध्ये राहाणाऱ्या वाररकर्त्यांना मदत व्हावी तसेच त्यांच्यापर्यंत बँकिंग आणि आर्थिक बदलांसंबंधीची माहिती वेळेत आणि सहज व सोप्या पद्धतीने पोहचावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेंकडून सर्वसामान्य लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी ‘आरबीआय कहता है’ नावाची मोहिम सुरू केली आहे. हे व्हॉट्सअॅप चॅनल त्याचाच एक भाग आहे. या मोहिमेअंतर्गत आधीपासूनच एसएमस, टीव्हीवरील जाहिराती, वृत्तपत्रे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून माहिती पोहचवली जात आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप चॅनलचा देखील समावेश झाला आहे. याच्या मध्यामातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे.
व्हॉट्सअॅप चॅनल का लाँच केले?
रिझर्व्ह बँकेने व्हॉट्सअॅप चॅनल सुरू करण्यामागील कारण स्पष्ट केला आहे. व्हॉट्सअॅप चॅनेलचे उद्दिष्ट हे बँकिंग, डिजिटल सुरक्षितता आणि इतर महत्त्वाच्या विषयांबद्दल थेट वापरकर्त्यांना खात्रीलायक आणि वेळेवर माहिती देणे हा आहे. सोशल मीडियावर अनेकदा खोच्या बातम्या परसत असतात त्यामुळे याचा फायदाहोईल. व्हॉट्सअॅप चॅनेलच्या मदतीने थेट आणि सोप्या पद्धतीने अधिकृत माहिती शेअर करून लोकांच्या शंका दूर केल्या जाऊ शकतात, याबरोबरच लोकांमध्ये विश्वास निर्णाण केला जाऊ शकतो असे आरबीआयचे म्हणणे आहे.
आरबीआयचे व्हॉट्सअॅप चॅनल कसे जॉईन करावे?
तर आरबीआयचे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा सोशल मीडिया हँडल्सवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा. याच्या माध्यमातून तुम्ही हे चॅनेल जॉईन करू शकता.
क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये आरबीआयचे व्हॉट्सअॅप चॅनेल उघडेल, येथे तुम्ही जॉईनवर क्लिक करून त्या चॅनेलला सब्स्क्राईब करू शकता.
तुम्ही चॅनेल जॉईन केल्यानंतर तुम्हाला आरबीआयकडून शेअर केलेल्या महत्त्वाच्या अपडेट्स आरबीआयच्या व्हेरिफाईड व्हॉट्सअॅप अकाउंटवर मिळू लागतील.
आरबीआयचे अधिकृत व्हॉट्सअॅप अकाउंट हे बिझनेस नंबर ९९९९ ०४१ ९३५ वरून चालवले जाते. तुम्ही आरबीआयच्या योग्य त्या चॅनेलला फॉलो करत आहात की नाही हे तपासण्यासाठी अकाउंटच्या नावापुढे व्हेरिफिकेशनचे चिन्ह आहे की नाही हे तपासून घेण्याचा वापरकर्त्यांना सल्ला दिला जातो.