मुंबई: नवीन कर्जांना मंजूरी आणि कर्ज वितरणावरील निर्बंधातून सचिन बन्सल यांच्या नवी फिनसर्व्हला रिझर्व्ह बँकेने सोमवारी तात्काळ प्रभावाने मुक्त करण्याचा निर्णय घेतला. चालू वर्षी २१ ऑक्टोबरपासून, बेंगळुरूस्थित या कंपनीसह इतर तीन बँकेतर वित्तीय कंपन्यांवर हे निर्बंध लादण्यात आले होते.
भारित सरासरी कर्ज दर आणि आकारले जाणारे व्याजही अत्याधिक असल्याचे आढळून आले आणि नियम-पालनांत हयगय होत असल्याचे पर्यवेक्षणाअंती स्पष्ट झाल्यावर हे निर्बंध या वित्तीय कंपन्यांवर मध्यवर्ती बँकेने आणले होते.
हेही वाचा >>> Gold Silver Rate Today : ऐन लग्नससराईत सोन्या-चांदीचे दर गडगडले, खरेदीपूर्वी आजचा भाव किती एकदा पाहाच
उणीवांमध्ये सुधाराच्या दृष्टीने नवी फिनसर्व्हशी संवादाच्या अनेक फेऱ्या दरम्यानच्या काळात घडल्या आणि सुधारित प्रक्रिया, प्रणालींचा अवलंब आणि नियामकांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे सातत्यपूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी कंपनीची वचनबद्धता लक्षात घेऊन हे निर्देश आता मागे घेत असल्याचे रिझर्व्ह बँकेने ताज्या आदेशांत म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये निर्बंध लादण्यात आलेल्या, नवी दिल्लीस्थित डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, कोलकातास्थित आरोहण फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि चेन्नईतील आशिर्वाद मायक्रो फायनान्स लिमिटेड या अन्य तीन बँकेतर वित्तीय कंपन्यांबाबत मध्यवर्ती बँकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही.