पीटीआय, मुंबई
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीला बुधवारी सुरूवात झाली. विकास दराची वाढीचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास बैठकीतील निर्णयांची घोषणा ८ डिसेंबरला करतील.
पततधोरण बैठक तीन दिवस चालणार आहे. मागील पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी महिन्यातील पतधोरणात व्याजदर वाढवून ६.५ टक्क्यांवर नेले होते. हे व्याजदर वाढीचे चक्र मे २०२२ पासून सुरू झाले होते. फेब्रुवारीनंतर व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रशिया – युक्रेन युद्ध आणि जागतिक पातळीवर पुरवठा साखळीत उलथापालथ झाल्याने वाढलेली महागाई यामुळे व्याजदरात त्यावेळी वाढ करण्यात आली होती.
हेही वाचा… देशातील ७५ जिल्हे बनणार निर्यात केंद्र
डॉईश बँक रिसर्चच्या अंदाजानुसार, रिझर्व्ह बँकेककडून सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज वाढवून ६.८ टक्क्यांवर नेला जाण्याची शक्यता आहे. आधी हा अंदाज ६.५ टक्के होता. याचबरोबर चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ५.४ टक्क्यांवर कायम ठेवला जाईल. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर स्थिर ठेवला जाईल.