मुंबई : सातत्य आणि स्थिरतेवर भर देत, सध्याच्या अस्थिर जागतिक आर्थिक आणि राजकीय वातावरणाच्या आव्हानांचा सतर्क राहून आणि कुशलेतेने सामना केला जाईल, असे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी त्यांच्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेत निर्धार व्यक्त केला. मध्यवर्ती बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिझर्व्ह बँकेसारख्या प्रतिष्ठित संस्थेचे नेतृत्व करणे हा एक सन्मान आहे आणि सन्मानापेक्षाही ही एक मोठी जबाबदारी आहे. रिझर्व्ह बँकेचा वारसा कायम ठेवणार असून या अंगाने धोरण स्थिरता आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. या संस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील, असे मल्होत्रा म्हणाले.

हेही वाचा : विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री

स्थिरता महत्त्वाची असली तरी, आपण सतत बदलणाऱ्या जगात वावरत आहोत. इतर संस्थांप्रमाणे, एकाच गोष्टीमध्ये आपण अडकून राहू शकत नाही. धोरणसातत्य राखताना कायम सावधगिरी आणि चपळतेने निर्णय आवश्यक ठरेल. आमच्याकडे सर्व ज्ञानाची मक्तेदारी नाही, असे सांगत इतर सहभागींशी विस्तृत सल्लामसलतीच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. शिवाय वित्तीय नियामक म्हणून, विविध राज्य सरकारे आणि केंद्रासह सर्व विभागांशी संवाद साधत राहणार असल्याचे मल्होत्रा यांनी नमूद केले.

हेही वाचा : अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ

मध्यवर्ती बँकेची सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे बँकिंग क्षेत्रासह आर्थिक समावेशनाचा प्रसार करणे आहे. त्यामुळे भविष्यात आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल, असे त्यांनी सूचित केले. आयआयटी-कानपूरमधून संगणक विज्ञानाची पदवी संपादन केलेल्या मल्होत्रा यांनी अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण या विषयांतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारणारे ते सलग दुसरे सनदी अधिकारी आहेत. नवीन जबाबदारीवर येण्याआधी केंद्रीय अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून ते कार्यरत होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi new governor sanjay malhotra on continuation of rbi policies and challenges print eco news css